शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, नाशिकमधील कार्यकर्त्यांचा ठराव | पुढारी

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, नाशिकमधील कार्यकर्त्यांचा ठराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी हा निर्णय मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र, निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका स्वीकारल्यानंतर नाशिक शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शहर कार्यालयावर एकत्र येत घोषणाबाजी करत राजीनामा मागे घेण्याबाबत ठराव केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी (दि. २) पुस्तक प्रकाशनाच्या भाषणादरम्यान आपण राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. पवार यांनी घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सांगितले. याबाबत पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बैठक घेत हा निर्णय मागे घ्यावा, असा ठराव केला. त्यानंतर रस्त्यावर येत घोषणाबाजीदेखील कार्यकर्त्यांनी केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, मनोहर कोरडे, राजेश भोसले, सुरेखा निमसे, रूपाली कोळी, गणेश पेलमहाले, मीनाक्षी काकळीज, रूपाली पाठारे, पुष्पा राठोड आदी उपस्थित होते.

शरद पवार साहेब आमचे खंबीर नेतृत्व असून, त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, याकरिता माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. साहेबच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजपर्यंत देशावर आलेल्या कुठल्याही संकटांविषयी पवार साहेब जरी विरोधी पक्षात असले तरी त्यांचा सल्ला घेतला गेलेला आहे. त्यामुळे साहेबांची पक्षालाच नव्हे तर देशालादेखील गरज आहे.

– कोंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

हेही वाचा : 

Back to top button