आता बरोबरी, पुढच्या वेळी चितपट ! आमदार राम शिंदे | पुढारी

आता बरोबरी, पुढच्या वेळी चितपट ! आमदार राम शिंदे

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीची कुस्ती बरोबरीत सुटली आहे. मात्र पुढच्या कुस्तीमध्ये आमदार रोहित पवार यांना चितपट करू, असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले. कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेल्या नवनिर्वाचित नऊ संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार शिंदे, अंबादास पिसाळ, तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, प्रवीण घुले, सचिन पोटरे, अनिल गदादे, अमृत लिंगडे, विनोद दळवी, नवनिर्वाचित संचालक आबासाहेब पाटील, मंगेश जगताप, बळीराम यादव, काकासाहेब तापकीर, नंदराम नवले, विजया गांगर्डे, लहू वतारे, बापूसाहेब नेटके, दादासाहेब सोनमाळी, संपतराव बावडकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, आमदार रोहित पवार यांना भीती वाटत असल्यामुळे ते कालच त्यांचे विजयी झालेले सर्व नऊ संचालक पळवून घेऊन गेले आहेत. मात्र, त्यांना माहित नाही जरी सर्व संचालक तिकडे नेले तरीदेखील दोन वेळा त्यांना आम्ही काय करू शकतो, हे दाखवून दिले आहे. आमचे व्यापारी मतदारसंघातील विजयी होणारे उमेदवार त्यांनी नेले. आमचे काही उमेदवार अवघ्या दोन ते तीन मतांनी पराभूत झाले. अन्यथा, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्ण बहुमतही आले असते. आता कुस्ती रंगात आली आहे. यावेळेस कडेला गेली. मात्र, आता पैलवान मध्ये घेतला आहे. पुढच्या वेळी मात्र चितपटच मारतो, असे आमदार शिंदे म्हणाले.

अंबादास पिसाळ म्हणाले, कार्यकर्त्यांच्या जवळचा, गावातील, नातेवाईक व इतर काही संबंधामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतांची फटाफूट झाली. वास्तविक पाहता मी व काकासाहेब तापकीर हे दोन संचालक असताना 600 पेक्षा जास्त मते सेवा संस्थेमध्ये पडण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे निवडणुकीत फटका बसला. प्रास्ताविक शेखर खरमरे यांनी केले. आभार सचिन पोटरे यांनी मानले.

..तर त्यांचे चार संचालक फोडू
वैयक्तिक, तसेच नातेसंबंधामुळे मतांची फाटाफूट झाली. आमची काही मते फुटल्याने निवडणुकीत त्याचा फटका बसला. मात्र, सभापती पदाच्या निवडणुकीत निश्चितपणे आपली चिठ्ठी निघेल. जर आमचे संचालक फोडण्याचा प्रयत्न केला, तर एका संचालकामागे चार संचालक फोडू, असा इशाराही पिसाळ यांनी दिला.

पद देऊन उपकार केले नाहीत
आम्हाला कोणीही पदे दिली नाहीत. पक्षासाठी कष्ट घेतले होते, म्हणून त्या पदापर्यंत पोहोचलो होतो. कोणी उपकार केलेले नाहीत. बोलणार्‍यांचे जेवढे वय आहे, त्यापेक्षा जास्त आमचा राजकारणातला अनुभव आहे, अशी टीका काकासाहेब तापकीर यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केली.

Back to top button