बारामती : नाझीरकरांसह इतरांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा | पुढारी

बारामती : नाझीरकरांसह इतरांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शेतामध्ये पाईप जोडण्यासाठी गेलेल्या शेतमजूर महिलेच्या पतीसह त्याच्या साथीदाराला दमदाटी करत महिलेचा विनयभंग करत तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हनुमंत नाझीरकर यांच्यासह चौघांविरोधात माळेगाव बुद्रुक पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 30 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये हनुमंत नाझीरकर, बापूराव कोकरे (रा. भिवाईमाळ, गायकवाडवस्ती, सोनकसवाडी, पणदरे), गणेश चव्हाण व उमेश चव्हाण (रा. ढाकाळे, ता. बारामती) यांचा समावेश आहे. मंगळवारी (दि. 25) सायंकाळी 5 वाजता पवारवाडी- ढाकाळे येथील शेतामध्ये ही घटना घडली.

फिर्यादी या संध्याराणी खोमणे यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी त्या पतीसह अन्य मजूर व शेतमालक खोमणे शेतात उपस्थित होत्या. शेततळ्यात पाणी येत नसल्याने त्या नाझीरकर यांच्या शेतात जलवाहिनी बघत गेल्या. तेथे त्यांनी खोमणे यांच्या शेताकडे येणारा पाईप तोडून ते पाणी पाण्याच्या टाकीत जोडलेले दिसले. खोमणे यांनी आमची जलवाहिनी परस्पर का तोडली, अशी विचारणा केली असता आरोपींनी दमबाजी केली.

ही जलवाहिनी माझीच आहे, मी तोडीन अगर काहीही करीन, तुमचा काय संबंध असे नाझीरकर बोलले. खोमणे यांनी सांगितल्यानुसार त्यांच्याकडील शेतमजूर ही जलवाहिनी जोडत असताना नाझीरकर व कोकरे यांनी फिर्यादीच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच गणेश व उमेश चव्हाण यांनी फिर्यादीचा पती व अन्य एकाला मारहाण केली.

फिर्यादी सोडविण्यासाठी गेली असताना तिचा विनयभंग करण्यात आला. शेतमालकीन सोडविण्यात आल्या असताना त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तू येथे शेती कशी करते तेच बघतो, तुझा ऊस मीच जाळला, माझे कोणीही काही करू शकत नाही, असे म्हणत शिवीगाळ तसेच दमदाटी करण्यात आली. वाहनाखाली चिरडून मारून टाकू, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादीचा पती व अन्य एका मजुराच्या अंगावरील कपडे, मोबाईल काढून घेत त्यांना मोटारीत घालून नेण्यात आले.

सायंकाळी फिर्यादीचा पती घरी आल्यानंतर तिने विचारणा केली असता आरोपींनी मोटारीतून नेत बेदम मारहाण केली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतमालकीन यांनी भावाची मदत घेत पोलिस ठाणे गाठले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे अधिक तपास करत आहेत.

Back to top button