नाशिक : आज ठरणार मालेगाव कृउबाचे कारभारी | पुढारी

नाशिक : आज ठरणार मालेगाव कृउबाचे कारभारी

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर प्रचार थांबला, शुक्रवारी (दि. 28) मतदान होत आहे. 18 जागांचे भवितव्य 3,970 मतदार ठरवतील. प्रशासनाने चार मतदान केंद्रांची निर्मिती केली असून, त्या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान करता येईल. दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि. 29) नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन मंगल कार्यालयात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी दिली.

मालेगाव कृउबासाठी यंदा तिरंगी लढत होत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनल, ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल आणि शेतकरी संघटनांचे बाजार समिती बचाव पॅनल नशीब आजमावत आहे. त्यांचे भवितव्य शुक्रवारी पेटीबंद होईल. चार मतदान केंद्रे आहेत. सौंदाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, निमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, झोडगे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व मालेगाव शहरातील ल. रा. काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर याठिकाणी मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सौंदाणे केंद्रात सोसायटी गटातील 227, तर ग्रामपंचायत गटातील 184 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निमगाव केंद्रात सोसायटी गटातील 334, तर ग्रामपंचायत गटातील 246 मतदारांची व्यवस्था असेल. झोडगे केंद्रात सोसायटी गटातील 574, तर ग्रामपंचायत गटातील 475 मतदार मतदान करतील. शहरातील काबरा केंद्रात सोसायटी गटातील 464, तर ग्रामपंचायत गटातील 327 मतदार मतदान करतील. याच ठिकाणी व्यापारी – आडत गटातील एक हजार 126 मतदार, तर हमाल – तोलारी गटातील 261 मतदारदेखील मतदानाचा हक्क बजावतील. मतदान कर्मचार्‍यांना गुरुवारी (दि. 27) मतदान साहित्याचे वाटप झाले.

आज बाजार बंद
बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी (दि. 28) होत असल्याने मुख्य आवारासह झोडगे, निमगाव व मुंगसे येथील शेतमालाचे लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. भाजीपाला, फळफळावळ विभाग व गुरांचा बाजारही बंद राहणार आहे.

अशा जागा, असे मतदार
सोसायटी गट (11 जागा)
सर्वसाधारण – 7
महिला राखीव- 2
इतर मागासवर्गीय- 1
भटक्या जाती विमुक्त जमाती 1
एकूण मतदार : 1 हजार 586

ग्रामपंचायत गट (4 जागा)
सर्वसाधारण – 2
अनुसूचित जाती जमाती 1
आर्थिक दुर्बल घटक 1
एकूण मतदार : 1 हजार 232

व्यापारी गट (2 जागा)
एकूण मतदार 1 हजार 126

हमाल मापारी एकूण जागा 1
एकूण मतदार 26

हेही वाचा:

Back to top button