Nashik : पिंपळदला पिंजऱ्यांची तटबंदी कायम; २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच

Nashik : पिंपळदला पिंजऱ्यांची तटबंदी कायम; २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, वनविभागाकडून बिबट्याच्या शोधार्थ 'सर्च ऑपरेशन' अजूनही सुरू असून, वनविभागाची पथके पिंपळदमध्ये तळ ठोकून आहेत. परिसराला १८ पिंजऱ्यांसह तब्बल दोन डझन ट्रॅप कॅमेऱ्यांची तटबंदी कायम आहे, तर बिबट्या जेरबंद झाला नसल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

पिंपळद येथे ६ एप्रिलला सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात प्रगती उर्फ देविका भाऊसाहेब सकाळे (वय ७) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारचे बिबट्याचे हल्ले त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिक्षेत्रात सातत्याने होत असल्याने ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ही बाब थेट वन मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हापासून वनविभाग 'अलर्ट मोड'वर असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने १८ पिंजरे व २५ ट्रॅप कॅमेरे तैनात केले आहेत. पिंपळदसह सापगाव, धुमोडी, शिरगाव या परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवली आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये घटनास्थळी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल काहीअंशी चित्रित झाली. दोन-तीन वेळा ड्रोनमध्ये आढळला होता. त्यानंतर बिबट्या गायब झाला. बिबट्या पिंजऱ्यात कैद होत नसल्याने तसेच 'ट्रँक्युलाइज' करण्यासाठी वनविभागाकडून 'ऑपरेशन ओपन' राबविण्यात येत आहे. पिंजऱ्याऐवजी खुल्या ठिकाणी सावज ठेवूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने वनाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

पिंपळद परिसरातील डोंगर, टेकड्या, शेतमळ्यांसह नदीच्या खोऱ्यात बिबट्याला पुरेसे लपण उपलब्ध आहे. मात्र, गेल्या १० ते १२ दिवसांपासून ट्रॅप कॅमेरे अथवा ड्रोनमध्ये तसेच स्थानिकांनाही बिबट्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे बिबट्या अन्य ठिकाणी मार्गस्थ झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, पुढील दुर्घटना टाळण्यासाठी तसेच वरिष्ठ कार्यालयाचे आदेश येईपर्यंत बिबट्याचा शोध घेतला जाणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

'शूटआउट'चा प्रस्ताव बारगळला

तांत्रिक समितीने सर्वतोपरी प्रयत्न करुनही बिबट्या कैद झालेला नाही. मात्र, त्याने नव्याने कोणत्याही माणसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे त्याला ठार करण्यासंदर्भातील प्रस्ताव सध्या तरी बारगळल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news