श्रीरामपूर : मेवा मिळविणार्‍यांचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष : आ. लहू कानडे | पुढारी

श्रीरामपूर : मेवा मिळविणार्‍यांचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष : आ. लहू कानडे

श्रीरामपूर(नगर); पुढारी वृत्तसेवा : कृ. उ. बाजार समितीच्या माध्यमातून हमीभावाने अधिक रकमेनेच शेतमालाची खरेदी व्हावी, अशी अपेक्षा असते, परंतु केवळ सत्तेतून मेवा मिळवण्यासाठी धडपडणार्‍या लोकांनी शेतकरी हिताकडे दुर्लक्ष केले व शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून दिल्याची बाजार समितीची अवस्था आहे, अशी टीका आ. लहू कानडे व अविनाश आदिक यांनी बाजार समिती निवडणुकीच्या तालुका प्रचार दौर्‍या प्रसंगी सभासद मतदारांशी बोलताना केली.

आ. कानडे म्हणाले, अहोरात्र घाम गाळून शेतमालाला भाव मिळत नाही हिच शेतकर्‍यांची मोठी समस्या आहे. शासनाने काही पिकांचे हमीभाव जाहीर करण्याचे धोरण घेतले आहे, असे असुनही व्यापार्‍यांकडून हमीभावाने शेतमाल खरेदी होत नाही. शेतकर्‍यांची लुट केली जाते. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करणारे व सत्ता हे समाजसेवेचे साधन आहे, असे मानणार्‍या नव्या नेतृत्वाची गरज आहे. यामुळे त्याच त्या लोकांना संधी देण्याऐवजी महाविकास आघाडी, शेतकरी संघटना पृरस्कृत शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन आ. लहू कानडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे, शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले व सुरेश ताके यांनी यावेळी बोलताना केले.

बाजार समितीच्या कारभारामध्ये सुधारणांची गरज

बाजार समिती कारभारामध्ये आमुलाग्र सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. वारंवार होणारे घोटाळे थांबविण्याची गरज आहे. शेतकरी हिताऐवजी मार्केट कमिटीच्या गाळे खरेदी- विक्रीच्या राजकारणात सहभागी असणारांना संचालक मंडळाला पुन्हा संधी मिळता कामा नये. यासाठी महाविकास आघाडी व शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन आ. लहू कानडे यांनी केले.

Back to top button