नाशिक शहरात वसाहती झाल्या मोठ्या, रस्ते झाले छोटे! | पुढारी

नाशिक शहरात वसाहती झाल्या मोठ्या, रस्ते झाले छोटे!

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर रोडसह सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या अशोकनगरच्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम दोन वर्षांपासून मंजूर असूनही महापालिकेच्या ढिम्म कारभारामुळे रखडले आहे. विशेष म्हणजे २० वर्षांच्या कालावधीत अशोकनगर परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प व नववसाहती उभ्या राहिल्या आहेत. परंतु वाढलेली लोकवस्ती व रहदारीच्या तुलनेत वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे.

अशोकनगरच्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरणच न झाल्याने नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणदेखील वाढले आहे. या अतिक्रमणाला अभय देण्यासाठीच मनपा प्रशासन रुंदीकरण करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशोकनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवा, अशी मागणी वारंवार केली जात असूनही प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या अशोकनगर पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारीदेखील वाहतूक कोंडी सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही वाहनचालकांनी केला आहे. आठ तास काम करून कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना अवजड वाहनांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. किमान सायंकाळी तरी अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणीही वाहनचालकांनी केली आहे.

दुभाजक टाकण्यासाठी त्रंबकेश्वर रोडवरील समृद्धनगर, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर ते थेट बारदान फाट्यापर्यंत काम मंजूर करण्यात आले होते. दुभाजक टाकण्यात अनेक ठिकाणी अतिक्रमणांचा अडथळा येत होता. मनपाच्या नगररचना विभागाने अतिक्रमण असलेल्या ठिकाणी मोजणीही केली होती. मात्र, राजकीय दबावात मोजणीकरूनही अतिक्रमणे काढण्यात आली नसल्याने रस्ता रुंदीकरण रखडले आहे. त्यातच रस्त्यावर दुभाजकाचे काम हाती घेण्यात आले होते. दुभाजकाच्या कामातही अनेक त्रुटी समोर आल्या. यामुळे कुठे दुभाजक, तर कुठे नाही अशी परिस्थिती अशोकनगर रस्त्यावर आहे.

आयुक्तांनीच करावी पाहणी
रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांमुळे दररोज सायंकाळी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत अनेकदा वाहनचालकांनी स्थानिक माजी नगरसेवकांकडे समस्याही मांडल्या आहेत. मात्र, त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. सध्या प्रशासकीय राजवट असल्याने मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीच स्वत: पाहणी करून अशोकनगर रस्त्याचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह कंपनी कामगारांनी केली आहे.

अशोकनगर मुख्य रस्ता हा रहदारीचा आहे. नववसाहती दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु २० वर्षांत अशोकनगर रस्ता आहे तेवढाच आहे. इतर विभागांतील रस्ते रुंदीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सातपूर-अशोकनगर परिसर विकासापासून दूर असून, नागरिक अनेक समस्याना तोंड देत आहेत. – सॅम फर्नांडिस, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा:

Back to top button