

नगर; पुढारी वृत्तसेवा : या वर्षभरात मुदत संपणार्या जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींची प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी ते एप्रिलपर्यत मुदत संपणार्या 78 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षभरात मुदत संपणार्या ग्रामपंचायतींची प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मार्च महिन्यातच दिले होते. त्यानुसार प्रारंभी प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने 17 मार्च रोजी प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द केली.
या प्रभागरचनेवर 24 मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. उपलब्ध हरकतींवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेतली. राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेतल्यानंतर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी मंगळवारी (दि.25) 195 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना प्रसिध्द केली आहे.
सध्या जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुदत संपणार्या 78 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त आहेत. यामध्ये जानेवारी महिन्यात मुदत संपणार्या 59 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अंतिम प्रभागरचना प्रसिध्द झाल्यामुळे लवकरच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
आश्वी खुर्द व बुद्रूक, कोळगाव, बोधेगाव, बालमटाकळी, दाढ बु., उंदिरगाव, उक्कलगाव, मुंगी, देऊळगाव सिध्दीकी, सडे, पाचेगाव, पिंपरी निर्मळ, विसापूर, शहर टाकळी, दत्तनगर, रस्तापूर, पोहेगाव, धोत्रे, पिंपळगाव कोझिंरा, भैरवनाथ नगर, फत्त्याबाद, हिरणगाव, जवखेडे, कनकुरी, जवळके, दुर्गापूर, देवदैठण, वारी, मेहेकरी.