जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा | पुढारी

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

राज्यातील सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोकांचे राज्य आहे. सरकारचा ‘डेथ वॉरंट’ तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. पुढील १५ दिवसात राज्यातील हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यांना आता पुष्पचक्र अर्पण करा, अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभेनिमित्त संजय राऊत जिल्ह्यात आले आहेत. सभेपूर्वी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढविला. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले की, आम्ही न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहोत. राज्यातील सरकार पुढील १५ ते २० दिवसांत पडल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी न्यायालय निकाल देईल. तो या सरकारचा शेवटचा दिवस असेल. या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेले आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे बाकी आहे.

गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. कोरोनाच्या नावाने जळगाव जिल्ह्यात तब्बल ४०० कोटींचा घोटाळा झाला आहे. कोरोना काळात पालकमंत्री म्हणून आणि जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून गुलाबराव पाटील यांनी चढ्या भावाने बेफाम खरेदी केली. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचे व्हेंटीलेटर १५ लाखांना खरेदी केले गेले. महत्त्वाचे म्हणजे या भ्रष्टाचारावर त्याच समुहाचे सदस्य चिमणराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. हा घोटाळा साधारण ४०० कोटी रुपयांचा आहे. मात्र, हे प्रकरण दाबले जात आहे, असेही राऊत म्हणाले.

फडणवीसांमुळे भ्रष्टाचारी लोक खुश…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणारे आनंदी आहेत. जणू काही आपला बाप आल्याचे त्यांना वाटत आहे. राहुल कुल यांच्या पाचशे कोटीचे प्रकरण पुराव्यासकट मी त्यांच्याकडे पाठवले. फडणवीस यांच्याकडून हे प्रकरण दाबले जात आहे. दादा भुसे यांनी तेरणा सहकारी साखर कारखान्यात १८०० कोटीचा भ्रष्टाचार केला. त्यावर देखील फडणवीस यांनी काय केले. आता गुलाबराव पाटील यांचे प्रकरणाबाबत खुलासा करत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button