Nashik : करवसुलीत नाशिक मनपा राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांकडून गौरव

Nashik : करवसुलीत नाशिक मनपा राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांकडून गौरव
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

करवसुलीसह राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) व सन २०२२-२३ मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथे नगरविकास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सत्कार सोहळा झाला. विशेष बाब म्हणजे करवसुलीत नाशिक महापालिका राज्यात अव्वल ठरली.

आयुक्त आणि कर विभागाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागातील कर्मचारी आणि सहा विभागीय अधिकारी यांचे अथक प्रयत्न तसेच प्रभावी वसुली मोहीम राबविल्याने २०२२-२३ चे करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. १५० कोटी करवसुलीचे उद्दिष्ट होते. नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच १२५ टक्के वसुली होऊन १८८ कोटी ७३ लाख रुपये इतका मालमत्ता कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला. तसेच नाशिक मनपाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) अंतर्गत सर्व घटकांमध्ये १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. बचतगट करणे, त्यांना शासनाकडून फिरता निधी देणे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगाराकरिता बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे, बेघर व्यक्तींना बेघर निवारा केंद्रांतर्गत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे या सर्व घटकांमध्ये मनपाने उत्कृष्ट काम केले आहे. तसेच प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजने अंतर्गत महाराष्ट्रात १४० टक्के काम करून मनपाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

तसेच नाशिक मनपाने २०२२-२३ मधील आस्थापना खर्च आटोपशीर ठेवण्यात यश मिळविले आहे. प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून आणि प्रभावी उपाययोजना राबवून ३३.०३ टक्के एवढा प्रशासकीय खर्च मर्यादित ठेवण्यात यश मिळविले आहे. मुंबईतील नगरविकास विभागाच्या या कार्यक्रमाला आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्यासह मनपा उपआयुक्त (एनयूएलएम विभाग) करुणा डहाळे उपस्थित होत्या.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news