लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : राजस्थान रॉयल विरुद्ध लखनऊ जाएंट या दोन संघामध्ये झालेल्या आयपीएल मॅचवर लोणावळ्यातील एका बंगल्यात बसून सट्टा घेणार्या पाच जणांवर पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई करीत गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, काही मोबाईल व टिव्ही असा साधारणतः 1 लाख 57 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण एलसीबीचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे सुरु असलेल्या राजस्थान रॉयल विरुद्ध लखनऊ जाएंट या आयपीएल टी-20 सामन्यावर काही जण लोणावळ्यात एका खाजगी बंगल्यात बसून बेटिंग घेत असल्याची गुप्त माहिती पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तुंगार्ली भागातील संबंधित बंगल्याजवळ सापळा लावत बुधवारी रात्री छापा मारला असता. आत बंगल्यामध्ये पाच जण वेगवेगळ्या नावाने घेतलेल्या विविध मोबाईल सिमच्या माध्यमातून काही अॅप्लिकेशनचा वापर करत लॅपटॉपवर बेटिंग घेत असताना पोलिसांना मिळून आले.
राजविनसिंग मनजितसिंग बांगा (वय 27, क्लब व्यवसाय, रा. वडाळा ट्रक टर्मिनल, मुंबई), मस्कीनसिंग रजेंद्रसिंग अरोरा (वय 30, क्लब व्यवसाय रा पंजाबी कॉलनी, सायन कोळीवाडा), शषांक महाराणा (रा. प्रतिक्षानगर सायन ईस्ट), इफ्तेकार ऊर्फ इमरान खान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), बेन्टी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सायन ईस्ट कोळीवाडा) अशी या पाच जणांची नाव असून त्यांच्यावर भादवि कलम 420, 465, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4(अ), भारतीय टेलिग्राफ अॅक्ट कलम 25 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एलसीबी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी हे
पुढील तपास करत आहेत.