आसाम-अरुणाचल प्रदेश सीमाप्रश्न संपुष्टात;  गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत ऐतिहासिक करार | पुढारी

आसाम-अरुणाचल प्रदेश सीमाप्रश्न संपुष्टात;  गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत ऐतिहासिक करार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात 1972 पासून सुरू असलेला सीमावाद अखेर संपुष्टात आला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री अनुक्रमे हिमंता बिस्वा सर्मा आणि प्रेमा खांडू यांनी गुरुवारी या विषयीच्या करारावर सह्या केल्या. ही ऐतिहासिक घटना असल्याची प्रतिक्रिया खांडू यांनी व्यक्त केली.

या करारानुसार दोन्ही राज्यांमध्ये भूप्रदेशाचे समान वाटप करण्यात आले आहे. सर्मा आणि खांडू यांनी त्यास मान्यता दिली. यावेळी अमित शहा म्हणाले, दीर्घ काळापासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा प्रश्न निकालात निघाला असून त्यामुळे आता वादाचा मुद्दाच राहिलेला नाही.

काय होते नेमके प्रकरण?

आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सीमेची लांबी 804 किलोमीटर असून सीमावर्ती भागातील 123 गांवांवरून दोन्ही राज्यांत वारंवार वाद उफाळून येत होता. त्यातील 36 गावांविषयी यापूर्वीच तोडगा काढण्यात आला होता. त्यानंतर आता उर्वरित 87 गावांचा मुद्दाही निकालात निघाला आहे. या सीमावादावरून दोन्ही राज्ये न्यायालयात गेली होती. मात्र, अमित शहा यांनी शिष्टाई करून सीमाकरार घडवून आणला. परिणामी, दोन्ही राज्यांत सीमेवरून संघर्ष उद्भवण्याची शक्यता जवळपास संपल्याचे मानले जात आहे.

Back to top button