

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असे चित्र निर्माण होत असले तरी, छाननी नंतरच्या १४ व्या दिवशी ग्रामपंचायत व सहकारी संस्था गटातून मंगळवारी (दि. १८) चार तर बुधवारी (दि. १९) पाच असे एकूण नऊ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यात, एका उमेदवाराचे दोन व तीन उमेदवारांचे प्रत्येकी एक असे एकूण पाच उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. गुरुवारी (दि. २०) माघारीचा शेवटचा दिवस आहे.
जिल्ह्यात अग्रगण्य म्हणून गणल्या जाणाऱ्या नाशिक बाजार समिती निवडणुकीत आजी-माजी खासदार नव्हे तर महाविकास आघाडी व भाजप-शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. बुधवारी (दि. ५) छाननीत १३७ उमेदवारी अर्ज वैध ठरले. गुरुवार (दि. ६) पासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, सोमवार (दि. १७) पर्यंत एकही अर्ज माघारी झाला नव्हता. मंगळवारी (दि. १८) दोन उमेदवारांचे ४ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले होते. तर बुधवारी (दि. १९) ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण व आर्थिक दुर्बल गटातून रंजना भाऊसाहेब खांडबहाले यांचा प्रत्येकी एक असे दोन अर्ज व सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून शांताराम रामदास माळोदे, सुरेश रामचंद्र बोराडे तसेच सहकारी संस्था इतर मागासवर्ग गटातून निवृत्ती विठोबा अरिंगळे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. म्हणजेच चार उमेदवारांनी आपले पाच उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. गुरुवारी ( दि. २०) आणखी किती उमेदवार अर्ज माघारी घेतात. याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच पॅनल निर्मितीला सुरुवात होणार आहे.
स्थिती
१७० पैकी १६१ उमेदवारी अर्ज शिल्लक.
सहकारी संस्थेचा मतदारसंघ ११ पैकी सर्वसाधारण (७), महिला राखीव (२), इतर मागासवर्गीय (१), विमुक्त जाती विमुक्त जमाती (१) – यात एकूण १०१ अर्ज.
ग्रामपंचायत मतदारसंघ ४ पैकी सर्वसाधारण (२), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (१), आर्थिक दुर्बल घटक (१) – यात एकूण ३९ अर्ज.
हेही वाचा :