अजित पवार माध्यमांच्या आवडीचे, म्हणून भाजप प्रवेशाची मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे | पुढारी

अजित पवार माध्यमांच्या आवडीचे, म्हणून भाजप प्रवेशाची मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

माध्यमांचे ज्याप्रमाणे माझ्यावर प्रेम आहे, त्याचप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हेसुद्धा माध्यमांच्या आवडीचे आहेत. त्यामुळे ते दिसले नाहीत, की ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगितले जाते, त्यांच्या भाजप प्रवेशाची ‘मीडिया ट्रायल’ करण्यात आली, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, अजित पवारांच्या भाजप प्रवेशात कुठलेही तथ्य नाही. स्वतः अजितदादांनीच हा दावा फेटाळून लावला आहे. ‘जोपर्यंत माझ्यात जीवात जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीचे काम करत राहणार’, असे जाहीर केले आहे. त्यामुळे हा विषय संपला असल्याचे खडसे म्हणाले.

राज्यासह देशात प्रचंड समस्या वाढल्या आहेत. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण समस्यांनी त्रस्त आहेत. शेतकरी अवकाळी आणि गारपिटीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. तर दुसरीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे केंद्र शासन आणि राज्य सरकारवरील नागरिकांचा विश्वास कमी होत चालल्याची टीकाही त्यांनी केली.

…तर भाजपला कमी प्रतिसाद मिळणार

50 खोके एकदम ओके अशा मस्तीमध्ये सत्ताधारी आमदार सध्या वावरत आहेत. त्यामुळे या आमदारांना या जनतेचे काही घेणे देणे पडलेले नाही, असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

हेही वाचा

Back to top button