वासंतिक पुष्पोत्सवात सजले दगडूशेठ दत्तमंदिर | पुढारी

वासंतिक पुष्पोत्सवात सजले दगडूशेठ दत्तमंदिर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मोग-याच्या लाखो फुलांनी सजलेला दत्तमंदिराचा परिसर…सुवासिक फुलांनी साकारलेला महाराजांचा मुकुट… रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आभूषणे… शोभिवंत फुलांची आरास… आणि गुलाब, झेंडू, चाफा, लिलीसारख्या नानाविध फुलांनी सजलेल्या दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सव उत्साहात साजरा झाला. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अ‍ॅड. परदेशी म्हणाले, सुमारे 100 किलो मोगरा, 50 किलो झेंडू, 100 बंडल गुलाब फुले, 125 किलो गुलाब पाकळ्या, 9 हजार चाफ्याची फुले, जाई, जुई आणि पासलीच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सुभाष सरपाले आणि सहका-यांनी ही आरास साकारली. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंभेस्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा आणि कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांची प्रतिमा फुलांनी सजविण्यात आली.

Back to top button