नांदगाव : अवकाळीमुळे झाडे उन्मळून पडली. (छाया: सचिन बैरागी)
नांदगाव : अवकाळीमुळे झाडे उन्मळून पडली. (छाया: सचिन बैरागी)

नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यात रविवारी (दि.९) वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने थैमान घातले. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नांदगाव : अवकाळीमुळे कांदयाचे झालेले नुकसान.
नांदगाव : अवकाळीमुळे कांदयाचे झालेले नुकसान.

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगांव, बोलठाण, ढेकुण, कुसुम तेल, गोंडेगाव जवळीक आदी ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पावसा सोबतच वादळामुळे जातेगांव येथील श्रीराम मंदिर जवळील शेवरीचे झाड उन्मळून विजेच्या तारेवर पडल्याने विजेचे तीन खांब मोडले आहेत. मात्र वेळीच वीजपुरवठा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. जातेगांव येथील सैन्यदलात कार्यरत असलेले शशिकांत खैरनार, आणि त्यांचे बंधू गणेश खैरनार त्यांच्या राहत्या घराचे १२ पत्रे उडाले असून त्यांच्या शेतातील साठवून ठेवलेला सुमारे दहा क्विंटल कापूस आणि धान्याचे नुकसान झाले आहे. सहारा कृषी सेवा केंद्राचे संचालक गुलाब चव्हाण यांचे कांद्याचे शेड उडाल्याने साठवून ठेवलेला कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कोकीळा पाटील या महिला शेतकरी भगिनीचे शेतातील शेडनेट वादळामुळे उडाल्याने शेडनेट आणि त्यातील लागवड केलेला शिमला मिरची या पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे उन्हाळ कांदा, मका, लाल कांदा, कांद्याचे बियाणे, गहु पिकांचे तसेच रामफळ, आंबा, चिकू, केळी इत्यादी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वारंवार आलेल्या असमानी संकटामुळे शेती पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला असून आता पूर्णतः हतबल झाला आहे. नुकसान झालेल्या शेती पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

नांदगाव : बोरीच्या आकाराच्या गारा पडल्याने शेतपिकातील रोपांनी माना टाकल्या.
नांदगाव : बोरीच्या आकाराच्या गारा पडल्याने शेतपिकातील रोपांनी माना टाकल्या.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news