नाशिकमध्ये दोन हजार घरांची टाउनशिप उभारा! महसूलमंत्री विखे-पाटील | पुढारी

नाशिकमध्ये दोन हजार घरांची टाउनशिप उभारा! महसूलमंत्री विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सामान्यांना घरे मिळावीत हे शासनाचे धोरण आहे. त्याकरिता परवडणारी घरे बांधली जावीत. मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या किमती ८० लाख सांगितल्या जातात. त्यामुळे म्हाडाचे प्रकल्प उभारले जावेत, असा आमचा प्रयत्न आहे. नाशिकमध्येही परवडणारी घरे बांधता येतील. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यायला हवा. दोन हजार परवडणाऱ्या घरांची टाउनशिप उभारा, शासकीय जागेपासून सर्वच मदत केली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

बांधकाम व्यावसायिकांची सर्वाांत मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोच्या २०२३-२५ च्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्यात नूतन अध्यक्ष कृणाल पाटील यांनी कार्यकारणीसहित मावळते अध्यक्ष रवि महाजन यांच्याकडून पदभार स्वीकारला. ना. विखे-पाटील म्हणाले की, ‘समृद्धी महामार्गामुळे सर्वांची समृद्धी झाली आहे. मोठ्या शहरांनी याचा फायदा घेण्याची गरज आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन हजार परवडणाऱ्या घरांचा इतर शहरांसाठी आदर्श ठरेल, असा प्रकल्प राबविण्याची गरज आहे. नुकतेच शासनाने वाळू धोरण घोषित केले आहे. क्रेडाईच्या सदस्यांनी शहर व रिअल इस्टेट मार्केटिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून, ग्रोथ सेंटर उभारून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, नाशिकच्या विकासाला चालना मिळण्यासाठी नाशिकचे मार्केटिंग करणे गरजेचे असून, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पालादेखील गती देण्यात येणार आहे. नुकतीच नाशिकची निवड ही क्वालिटी सिटीमध्ये करण्यात आली आहे. शहरातील सर्व लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही ना. भुसे यांनी नमूद केले. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, सत्यजित तांबे, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्रेडाई राष्ट्रीयचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, घटना समितीचे प्रमुख सल्लागार जितुभाई ठक्कर, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार, विजय संकलेचा, सुनील भायभंग, अविनाश शिरोडे, उमेश वानखेडे, शिवसेनेचे अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

रवि महाजन यांनी, ‘अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना वेगवेगळ्या मुद्यांवर काम करण्याची संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. कृणाल पाटील यांनी, क्रेडाई संस्थेचे बांधकाम उद्योगात मोलाचे स्थान आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन व युवा सदस्यांचे सहकार्य यामुळे क्रेडाई नाशिक मेट्रो येत्या काळात नवीन उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास विविध असोसिएशनचे पदाधिकारी, व्यावसायिक, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दस्तनोंदणी कार्यालये हायटेक

राज्यातील सर्व दस्त नोंदणी कार्यालये हायटेक करण्यात येणार असून, शासन याकरिता ३२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. येत्या चार ते पाच महिन्यांमध्ये नागरिकांना याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. सर्वांत जास्त महसूल मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून शासनाला मिळतो. मात्र, तरीही हा महसूल भरणाऱ्या करदात्याला शासन काय देते? याचा सर्वंकष विचार करून नोंदणी होईल, असेही ना. विखे-पाटील यांनी सांगितले.

अशी आहे नवी कार्यकारिणी

अध्यक्ष – कृणाल पाटील, मानद सचिव – गौरव ठक्कर, उपाध्यक्ष – दीपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातांबरेकर, नरेश कारडा, कोषाध्यक्ष – हितेश पोतदार, सहसचिव – सचिन बागड, अनिल आहेर, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते, मॅनेजिंग कमिटी – मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणीक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निषित अटल, निमंत्रित सदस्य – सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, करण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथविंग समन्वयक – शुभम राजेगावकर, युथविंग सहसमन्वयक – सुशांत गांगुर्डे, महिला विंग सहसमन्वयक – वृषाली महाजन.

हेही वाचा : 

Back to top button