नगर : आमदार गडाखांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळेंवर गोळीबार प्रकरणी गुंड नितीन शिरसाठ दोन वर्षांसाठी तडीपार | पुढारी

नगर : आमदार गडाखांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळेंवर गोळीबार प्रकरणी गुंड नितीन शिरसाठ दोन वर्षांसाठी तडीपार

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड नितीन शिरसाठला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी नुकताच काढला आहे.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना धक्काबुक्की करत गावठीकट्टा लावून धमकावणे, त्याचबरोबर तत्कालीन कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाखांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळेंवर गोळीबार करणे, घोडेगावातील कुख्यात गुंड नितीन विलास शिरसाठला नगर विभाग उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दोन वर्षांसाठी नगर जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश पारित केले आहेत.

या अगोदरही शिरसाठला दोन वेळा तडीपारचे आदेश पारित केेले होते. त्याच्यावर सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत लहान मोठे असे एकूण 10 ते 15 गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये शिरसाठला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्यातील आठ गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने सोनई पोलिसांनी शिरसाठ विरोधात तडीपारीचा प्रस्ताव विभागीय अधिकार्‍यांकडे पाठविला होता.

त्याच्यावरील न्यायप्रविष्ठ गुन्हे
यात कलम 307 नुसार, शस्त्र अधिनियम 1957 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच, सदर गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. त्याने साथीदारासह हातात गज, काठ्याने, लाकडी दांडक्याने, घातक शस्त्राने मारहाण करून जखमी करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, संगनमत करून धारदार शस्त्राने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंडाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, लोखंडी रॉड, चाकू यासारख्या शस्त्राचा वापर करून मारहाण करणे, धमकी व शिवीगाळ करणे, यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, हे गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत.

Back to top button