नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, जय सीता, राम सीता असा जयघोष करीत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम व गरुड रथाच्या मिरवणुकीला राम मंदिर परिसरातून सुरूवात झाली. रथाची सुरूवात ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात करण्यात आली.
नाशिक महानगराचा ग्रामउत्सव म्हणजे श्रीराम नवमी आणि त्यानंतर चैत्र कामदा एकादशीस येणारा श्रीराम आणि गरुड रथोत्सव नाशिककरांसाठी मोठ्या श्रद्धेचा भाग आहे. रविवारी (दि. २) दुपारनंतर रथोत्सवाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली. यंदाचे उत्सवाचे मानकरी असलेल्या समीरबुवांना पांढरा फेटा बांधण्यात आला. परंपरेनुसार असणारे मानकरी रवींद्र दीक्षित, नंदन दीक्षित यांना निमंत्रण देण्यात आले. नारळ फोडून त्यानंतर आरती करून दास हनुमान मूर्ती मंदिराबाहेर काढण्यात आली. श्रीराम मूर्ती, चांदीच्या पादुका हातात घेऊन समीरबुवा यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवली. त्यानंतर आरती करून संध्याकाळी सहा वाजता काळाराम मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराबाहेर उभे असलेले दोन्ही रथ ओढून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने अवघी पंचवटी रामनामात न्हावून निघाली होती.
रथोत्सवासाठी आमदार राहुल ढिकले, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे उपस्थित होते. रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथासमोर भगवे ध्वज, पताकांसह सनई चौघडा, झांज, ढोल ताशे वाजवून वातावरण भक्तिमय केले जात होते. तसेच,ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून रथांचे स्वागत करण्यात येत होते. संपूर्ण रथ मार्गावर रांगोळ्या, ठिकठिकाणी भव्य कमानी उभारून परिसर मंगलमय करण्यात आला होता. रथ मार्गावरील अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
गरुड रथाचे रोकडोबा तालीम येथे आगमन झाल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर गरुड रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला तर श्रीराम रथ नदी पार करीत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला. शहराची प्रदक्षिणा करून गरुड रथाचे गौरी पटांगणात आगमन झाले असता याठिकाणी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली. दोन्ही रथांचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सवमूर्तींची अमृत पूजा, पंचामृत अभ्यंग स्नान, अवभृत स्नान आणि महापूजा करण्यात आली. रथोत्सवाच्या दिवशी भाविकांना देखील या उत्सव मूर्तीना स्नान घालण्यासाठी परवानगी दिली जाते. वर्षातील एकच असा हा दिवस असतो कि यावेळी काळाराम मंदिरात असलेल्या उत्सव मूर्तींना सामान्य नागरिक स्नान घालू शकतो त्यामुळे याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रथोत्सवानिमित्त परिसरात अनेकांनी लहान मुलांसाठी पाळणे, खेळणी फुगे आदीचे दुकाने थाटल्याने संपूर्ण गोदाघाटाला जत्रचे स्वरूप आले होते.
रथोत्सवासाठी काळाराम संस्थान, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, श्री अहिल्याराम व्यायाम शाळा, रोकडोबा तालीम संघ, गुलालवाडी व्यायाम शाळा, ओकाची तालीम संघ, मोहन मास्तर तालीम संघ, यशवंत व्यायाम शाळाचे मल्लपटू आदी ठिकाणचे पहिलवान, पदाधिकारी, विश्वस्त आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
रथयात्रेमध्ये लहान मुलांनी राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची वेशभूषा केली होती. तसेच काही मंडळांच्या वतीने ही अशी वेशभूषा केलेले कलाकार खास करून हरियाणा येथून बोलविण्यात आले होते. यामुळे उत्सवामध्ये त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
रथयात्रेमध्ये मानकरी उलटे चालण्याची परंपरा
उत्सवाचे मुख्य मानकरी देवाला पाठ दाखवत नाही. म्हणून समीरबुवा पुजारी संपूर्ण रथयात्रेमध्ये देवतासंमुख असतात आणि रथयात्रा मार्गावर उलटे चालतात.
श्री काळाराम मंदिरापासून निघालेला गरूडरथ व श्रीरामरथ ढिकले नगर नाग चौक काट्या मारुती पोलीस चौकी गणेशवाडीमार्गे गाडगे महाराज पुलाखालून श्रीरामरथ म्हसोबा पटांगण येथे थांबवण्यात आला . गरुडरथ हा गाडगे महाराज पुलाजवळून रोकडोबा व्यायामशाळा, दहिपूल, नेहरू चौक मार्गे, धुमाळ पॉईंट, मेनरोड, सरकारवाड्यामार्गे भांडीबाजार मार्गे म्हसोबा पटांगण येथे आला. पुन्हा गरूडरथ पुढे होऊन त्यापाठोपाठ श्रीरामरथ निघाला. देवीमंदिर, साईबाबा मंदिर, भाजी बाजारामार्गे रामकुंडावर दोन्ही रथ एकत्र आले. त्या ठिकाणी जवळपास दोन ते तीन तास अवभृतस्नान घालण्यात आले. यावेळी रामकुंडावर तसेच म्हासोबा पटांगणावरही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.