नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झालेले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसताना राज्य शासन यात्रेच्या माध्यमातून या प्रश्नांवरून विषय भरकटवण्याचा प्रयत्न करते, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, अशा शब्दांत त्यांनी सरकार टीका केली.
ना. पवार हे गुरुवारी (दि.३०) नाशिकच्या दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीने कांद्याचा प्रश्न उचलला. कांदा अनुदानात वाढ करण्याची मागणी आम्ही केली होती. शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, सरकारने 350 रुपयांचे अनुदान देत शेतकऱ्यांची चेष्टा केली, अशी टीका पवार यांनी केली. राज्यात केळी, संत्रा, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी त्यांनी केली.
राज्याचे अधिवेशन 25 मार्चला संपले आणि आज 30 तारीख आहे. नाशिकमध्ये नाफेडने कांद्याची खरेदी बंद केली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे पवार म्हणाले. त्यासोबत राज्यात काही ठिकाणी सरकारी हरभरा खरेदी केंद्र सुरू आहेत. मात्र, त्यात आणखी वाढ करण्याची गरज आहे, असेेही पवार यांनी सांगितले. कोरोनाचे संकट बघता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.
हा अपमान नाही का?
चुकीच्या कामांवर बोट ठेवल्यास राज्यातील सत्ताधाऱ्यांना राग येताे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत त्यांना नपुसंक म्हटले आहे. राज्याचा येथे अपमान नाही का? असे सांगत न्यायालय शासनावर ताशेरे ओढते म्हटल्यावर हे कसले गतिमान सरकार असा खोचक टोला पवार यांनी लगावला. न्यायालयाच्या टीपणीवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
२ एप्रिलची सभा होणार
छत्रपती संभाजीनगर येथील दंगली प्रकरण मागील मास्टरमाइंडचा पोलिसांना शोध घेतानाच ती मुद्दाम घडवून आणली का याचीही शहानिशा करावी, अशी मागणी पवार यांनी केली. पोलिसांनी मनात आणल्यास ते २४ तासांत परिस्थिती पूर्वपदावर आणू शकतात, असे सांगत २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे मविआची जाहीर सभा होणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे भूमिका मांडतील
दिल्ली न्यायालयाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे व खा. संजय राऊत यांना समन्स बजावल्याबाबत पवार यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर न्यायालयाने समन्स बजवावे हा त्यांचा अधिकार आहे. न्यायव्यवस्था त्यांचे कार्य करत असून, ठाकरे यांचे वकील न्यायालयात बाजू मांडतील, असे पवार म्हणाले.
जयंत पाटील यांनाच विचारा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य केले. याबाबत पवार यांना विचारले असता जे बाेलले त्यांनाच विचारा, असे सांगत त्यांनी पाटील यांचा वक्तव्याचा समाचार घेतला. पाटील यांच्याशी भेट झाल्यावर तुम्हाला ही माहिती कोठून मिळाली, हे मी नक्कीच विचारेल, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा :