Nashik : सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेण्यातच देशाचे हित : जयंत पाटील | पुढारी

Nashik : सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेण्यातच देशाचे हित : जयंत पाटील

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

संकोचित विचार देशाच्या विकासात बाधा निर्माण करतात. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्यातच आपले हित आहे. तसेच जागतिक स्तरावर देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रशासनाने पुढाकर घेणे आवश्यक आहे.  समृद्ध भारत घडविण्यासाठी दैनंदिन योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत कशा पोहचल्या जातील याकडे आज लक्ष देण्याची गरज आहे. धर्मा धर्मातील तेढ नष्ट करून एकसंघ भारत निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राज्यकर्त्यांनी  प्रयत्न करावे असे आवाहन माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी  केले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे 39 वे अधिवेशन व भारत आणि जागतिक राजकारण या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अँड. नितीन ठाकरे यांनी भूषविले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार दिलीप बनकर, मविप्र अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस  दिलीप दळवी, संमेलनाध्यक्ष डॉ. लियाकत खान, प्राचार्य डॉ. पी. डी देवरे, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार आदी उपस्थित होते. संमेलनाध्यक्षपदी मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक प्रा. डॉ. लियाकत खान उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य पूर्व काळात पंडित नेहरू हे साम्य वादाकडे झुकले मात्र त्यांनी भांडवलदारांच्या हाती सत्ता दिली नाही. आजच्या काळात मात्र भांडवल दारांशिवाय आपले काहीच चालणार नाही अशी विचार सरणी दृढ होत आहे. परिणामी खाजगीकरणावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे प्रश्न वाढत आहे. जागतिक राजकारणात उदारमतवादी विचारसरणी विश्वाचे नेतृत्त्व करू शकेल असे मत त्यांनी यावेळी मांडले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस  मा. अँड. नितीन ठाकरे यांनी भारतीय अर्थव्यवस्था कृषी प्रधान असताना देखील शेकऱ्यांच्या वाट्याला उपेक्षा येत आहे. त्यासाठी राजकीय समीकरणे बदलण्याची गरज असल्याचे म्हटले. आमदार दिलीप बनकर यांनी राजकारणातील चांगल्या वाईट गोष्टी शिक्षकांनी पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

हेही वाचा : 

Back to top button