पारनेर बाजार समितीत तिरंगी लढत!

शशिकांत भालेकर :
पारनेर : पारनेर बाजार समितीची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी- भाजप-शिवसेना ठाकरे गट या तीनही पक्षांनी स्वतंत्र आपापल्या बैठका घेत उमेदवारांसंदर्भात चाचणी केली. या पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने ही निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता मावळली असून, तिन्ही पक्ष निवडणुकीत आपले उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतली असून, भाजप नवख्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रवादीकडून तुल्यवाळ उमेदवार देण्याबाबत व्यहूरचना आखली जात आहे.
माविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाच्या शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांचे विचार मानणार्या उमेदवारांना संधी देऊ, असे म्हणत आमदार नीलेश लंके यांनी ठाकरे सेनेतील नेत्यांना डिवचले आहे. गत विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली. आमदार लंके राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांचा पराभव झाला. प्रशांत गायकवाड यांच्यावर दोन वेळा अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न झावरे गटाकडून औटींनासोबत झाला; मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यात गायकवाड यशस्वी ठरले असून, त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.
या निवडणुकीत मात्र चित्र बदलले असून, भाजपकडून सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राहुल शिंदे, सचिन वराळ आदींच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची निवडणूक लढवली जाणार आहे.राष्ट्रवादीकडून आमदार नीलेश लंके यांचा शब्द अंतिम असून, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, सुदाम पवार आदी सोबतीला असणार आहेत.
शिवसेना ठाकरे गट बाजार समितीत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले, माजी आमदार विजय औटी, माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, माजी सभापती गणेश शेळके, तालुकाध्यक्ष श्रीकांत पठारे, डॉ. भास्कर शिरोळे यांच्या जोरावर विजयश्री खेचण्याचा औटींचा प्रयत्न आहे. त्यापैकी उपतालुकाप्रमुख रामदास भोसले व माजी सभापती गणेश शेळके उमेदवारी अर्ज दाखल करत प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत.
कै. अॅड. उदय शेळके यांचे सोसायटी मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होते; मात्र त्यांच्या निधनामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीला त्यांची उणीव भासणार आहे. समितीचे माजी सभापती प्रशांत गायकवाड यांच्या हालचालींवर विरोधक, तसेच राष्ट्रवादीचे लक्ष असून, प्रशांत गायकवाड यांचे गेल्या बाजार समिती निवडणुकीत वर्चस्व राहिले होते.
तिरंगी लढतीत कोणाला फायदा!
बाजार समितीची निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, यामध्ये भाजप प्रथमच आपली ताकद तालुक्यात अजमावणार आहे. सोबतच शिवसेना ठाकरे गट राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्याच निवडणुकीला सामोरा जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेच्या यशानंतर पहिल्या तालुका पातळीवरील निवडणुकीला सामोरे जात आहे. तिरंगी लढतीत भाजप-राष्ट्रवादी-सेना ठाकरे गट यांच्यात मत विभागणी होणार, व त्या विभागणीचा फायदा प्रथमदर्शी राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे.
खासदार डॉ. सुजय विखेंचे पाठबळ!
खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्हा परिदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या वाढदिवसाप्रसंगी झालेल्या मेळाव्यात बाजार समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना केल्या होत्या. गरीब जनतेच्या जीवावर पूर्ण ताकदीने भाजप पारनेर तालुक्यातील सर्व निवडणूक लढवणार, पराभव झाला तरी बेहत्तर; मात्र तरुणांना निवडणुकीची संधी देणार असल्याचे खासदार डॉ. विखे यांनी स्पष्ट केले होते. ज्या नेत्यांनी पाटील तुमचा वापर केला त्यांच्या विरोधात गरीब कुटुंबातील तरुणांना उमेदवारी द्या, तालुक्याचे चित्र बदलेन हीच परिवर्तनाची नांदी ठरेल, असेही खासदार डॉ. विखेंनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या निवडणुकीत खासदार डॉ. विखे यांचे पाठबळ असणार आहे.
मत विभागणी अटळ!
पारनेर नगरपंचायत निवडणुकीवेळी भाजप-सेना यांच्यात युती होण्याची शक्यता होती; परंतु ते न झाल्याने व स्थानिक पातळीवर आघाडी झाल्याने तिरंगी लढतीत मत विभागणी झाली. त्यामध्ये नगरपंचायतीवर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु नंतर राष्ट्रवादीने बहुमताचा जादुई आकडा जुळवला, बाजार समितीतही मत विभागणी होणार असून, सरशी कोणाची, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.