ठाकरे गट नाशिक बाजार समितीच्या रिंगणात, सर्वच्या सर्व जागा लढणार | पुढारी

ठाकरे गट नाशिक बाजार समितीच्या रिंगणात, सर्वच्या सर्व जागा लढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शक्तिनिशी उतरण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाने घेतला आहे. बाजार समितीच्या सर्वच्या सर्व १८ जागा ठाकरे गट लढणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या कोअर समितीची बैठक नुकतीच झाली. पक्षाचे उपनेते बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या निवासस्थानी बैठकीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्याकडे पॅनल करण्याइतके सक्षम उमेदवार असून, अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुकांकडून अर्ज भरून घेत त्याची छाननी केली जाईल, अशी माहिती घोलप यांनी दिली. तसेच निवडणुकीमध्ये मित्रपक्षाशी आघाडी करावयाची किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या वेळी शिवसेनेने निवडणूक लढवून सहा उमेदवार निवडून आणले होते. यंदा पक्षाला पोषक वातावरण असल्याने त्याचा लाभ आम्ही उठवू, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितले. बैठकीस ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते आदी उपस्थित होते. बाजार समिती निवडणुकीत सोसायटी 11, ग्रामपंचायत 4, हमाल-मापारी 1 तर व्यापारी गट 2 अशा एकूण 18 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचे 2070 तसेच सोसायटी गटासाठी 1597 मिळून एकूण 3 हजार 667 मतदार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button