पुणे जिल्ह्यात सलग दुसर्‍या वर्षी सर्वाधिक पीककर्ज वाटप | पुढारी

पुणे जिल्ह्यात सलग दुसर्‍या वर्षी सर्वाधिक पीककर्ज वाटप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याने किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीककर्ज वाटपामध्ये सलग दुसर्‍या वर्षी उच्चांक गाठत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सन 2022-23 मध्ये आजअखेर एकूण 4 हजार 130 कोटी रुपये इतके पीककर्ज वाटप जिल्ह्यात झालेले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेत सर्व बँकांशी संपर्क साधत कर्ज वाटपातील अडथळे दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे ही विक्रमी कामगिरी शक्य झाली आहे. गत आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 3 हजार 894 लाख रुपये इतके पीककर्ज वाटप जिल्ह्यात झाले होते. त्याद्वारे या पूर्वीचा 2015-16 साली 3 हजार 506 कोटी 31 लाख रुपये कर्ज वाटपाचा विक्रम जिल्ह्यात मोडला होता. आता सुरू असलेल्या आर्थिक वर्षात गतवर्षीपेक्षा 236 कोटी रुपये अधिक पीककर्ज वाटप झाले आहे.

या वर्षीच्या 4 हजार कोटी रुपये एवढ्या उद्दिष्टापेक्षा 130 कोटी रुपये अधिक कर्जवाटप करून उद्दिष्ट ओलांडलेले आहे.
हे यश मिळवण्यासाठी आर्थिक वर्षाच्या प्रारंभापासूनच सर्व बँकांचा वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाबाबत वेळोवेळी बँकांची जिल्हापातळीवर बैठक घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयीकृत बँका, खासगी क्षेत्रातील बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जास्तीत जास्त पीककर्ज वाटपासाठी प्रोत्साहित केले. याव्यतिरिक्त कृषी मुदत कर्ज वाटपामध्येही जिल्ह्यात गत आर्थिक वर्षापेक्षा विक्रमी कामगिरी झाली आहे. 2022-23 मध्ये 4 हजार 965 कोटी रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत डिसेंबर 2022 अखेर 6 हजार 889 कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे. सन 2021-22 मध्ये याच क्षेत्रात 5 हजार 494 कोटी रुपये कृषी मुदत कर्ज वाटप झाले होते. याप्रमाणे सन 2022-23 मध्ये पीककर्ज व कृषी मुदत कर्ज मिळून कृषी क्षेत्रासाठी एकूण 10 हजार 927 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात
आले आहे.

बँकांच्या जिल्हा समन्वयक तसेच क्षेत्रीय व्यवस्थापकांशी दूरध्वनी व ई-मेलद्वारे संपर्क साधत अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. तालुकापातळीवर होणार्‍या बैठका तसेच दर महिन्याला पीककर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप शक्य झाले. यात जिल्ह्यातील सरकारी क्षेत्रातील सर्व बँका, खासगी क्षेत्रातील सर्व बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक या सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
                                                   – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

Back to top button