ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी ‘या’ टीप्स वापरा.. | पुढारी

ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी 'या' टीप्स वापरा..

सुंदर, रेखीव, नाजूक ओठ म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याची मुख्य निशाणी असते. सर्वच महिलांच्या नशिबी असे सुंदर ओठ नसतात. मात्र, ओठ कसेही असले तरी काही उपायांमुळे आणि योग्यप्रकारे काळजी घेतल्यास ते नक्कीच आकर्षक दिसू शकतात. त्यासंबंधीच्याच काही टीप्स…

अनेकदा वातावरणातील बदल, वाढते वय, ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळे ओठ फुटतात. ओठांच्या कडेला भेगा पडल्यामुळे तोंड उघडणेही कठीण जाते. त्यासाठी फळे, दूध,अंडी, मासे,भाज्या आणि सुकामेवा यासारख्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे. तसेच भरपूर पाणी पिणे ओठांसाठी आवश्यक असते.

१. ओठ कोरडे पडल्यास त्यावर ताजे लोणी लावावे त्यामुळे ओठांंना ओलावा मिळून ओठ मुलायम बनतात.

२. अनेकांना ओठ दाताने कुरतडण्याची सवय असते; त्यामुळे ओठांच्या त्वचेला इजा होते. ओठांचे पापुद्रे निघतात, ओठांना भेगा पडतात, त्वचा दबली गेल्यामुळे त्यातून रक्तही येते. अशावेळी ग्लॉसी लिपस्टिक वापरून ओठांना ओलावा मिळवता येतो, तसेच पारदर्शी रंगाच्या लिपबामचाही वापर करता येतो.

३. ब्रश करताना एक दोनवेळा ब—श ओठांवरून फिरवावा. त्यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. लोणी आणि मीठ एकत्र करून ओठांना मसाज केल्यासही ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.

४. कोरड्या पडणार्‍या ओठांसाठी रात्री झोपताना व्हॅससिन आणि लिंबाचा रस एकत्र करून लावावा.

५. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये केसर घालून ते ओठांना चोळावे. त्यामुळे ओठांचा काळेपणा कमी होऊन ओठ चमकदार दिसतील, तसेच डाळींबाची साल आणि डाळिंबाच्या दाण्यांचा रस ओठांवर चोळून लावल्यास ओठांचा रंग उजळण्यास मदत होते.

६. शेंगदाण्याच्या तेलाने ओठांना मसाज करून नंतर ओठ सुती कापडाने पुसून घेतल्यास नरम पडतात.

७. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना व्हॅसलिन लावून त्यावर लिपस्टिक लावल्यास ती जास्त वेळ राहते. ओठांना लावलेली लिपस्टिक जास्त
वेळ टिकावी म्हणून ती फ्रीजमध्ये ठेवावी.

८. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर टाल्कम पावडरचा थर दिल्यास लिपस्टिक जास्त वेळ टिकून राहते.

९. रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुवून त्यावर लिप बाम किंवा तूप लावावे.

१०. गडद लिपस्टिक लावल्यावर पेपर नॅपकिन किंवा रूमाल ओठांच्या मध्ये ठेवून त्यावर ओठांनी दाब द्यावा. त्यामुळे जास्तीची लिपस्टिक टिपली जाऊन ती आजूबाजूला पसरत नाही.

११. ओठ फाटून त्यातून रक्त येत असल्यास कोकम तेल आणि शुद्ध तूप यांचा वापर करावा किंवा व्हिटॅमिन ‘ई’ कॅप्सूल फोडून ओठांवर चोळावी.

– मेघना ठक्कर

Back to top button