मार्केट यार्डातील किराणा दुकानाला आग | पुढारी

मार्केट यार्डातील किराणा दुकानाला आग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मार्केट यार्डातील भुसार बाजार परिसरात असलेल्या एका किराणा माल, मसाले, सुका मेव्याची विक्री करणार्‍या दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत किराणा माल, मसाले, सुकामेव्याची पाकिटे जळाली. मार्केट यार्ड भुसार बाजार प्रवेशद्वार क्रमांक पाच परिसरात अगरवाल ट्रेडर्स सुकामेवा, मसाले आणि किराणा माल विक्रीचे दुकान आहे.

दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती सकाळी सव्वादहाच्या सुमारास अग्निशमन दलाला कळविण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे तीन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्याने जवानांनी पाण्याचा मारा केला. धूर मोठ्या प्रमाणावर झाल्याने आग आटोक्यात आणताना अडथळे आले. दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामात, तसेच दुकानात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. शिडी लावून जवान गोदामात शिरले.

पाण्याचा मारा करून अर्धा तासात आग आटोक्यात आणली. 15 जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. आगीत दुकानातील मसाले, सुकामेवा, किराणा माल जळाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रदीप खेडेकर, सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ससून रुग्णालयात अनर्थ टळला
ससून रुग्णालयातील महिला रोग निदान केंद्रातील इलेक्ट्रीक बोर्डला सोमवारी दुपारी आग लागली. कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. ससून रुग्णालयात कक्ष क्रमांक एकमध्ये महिला रोगनिदान केंद्र (वूमन डायग्नोस्टिक सेंटर) आहे. सोमवारी दुपारी कक्षातील इलेक्ट्रिक बोर्डाला आग लागली. अग्निरोधक उपकरणाचा वापर करून आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

Back to top button