पुणे : बैठक प्रशासनाची की भाजपची : आमदार रवींद्र धंगेकर | पुढारी

पुणे : बैठक प्रशासनाची की भाजपची : आमदार रवींद्र धंगेकर

पुणे : पुणे शहरातील विविध विकासकामांसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीला शहरातील आमदारांना निमंत्रित करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात बैठकीमध्ये भाजपचेच कार्यकर्ते सहभागी झाले. त्यामुळे ही बैठक पालकमंत्र्यांची होती की भाजपची, असा सवाल कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

बैठकीतून बाहेर पडल्यानंतर धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पुणे शहरातील प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना बैठकीला बोलावले होते. या बैठकीला तीन ते चारच आमदार होते. मात्र, बैठकीत निमंत्रित नसलेले भाजपचे कार्यकर्तेच चर्चा करीत होते. त्यामुळे ही बैठक प्रशासनाची की भाजपची, असा प्रश्न पडला. त्यामुळे मी बैठकीतून बाहेर निघून आलो. पुण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नदीपात्रातील सहा हजार झाडे तोडली जाणार आहेत. ही झाडे तोडू नयेत; अन्यथा पुणे वाळवंट झाल्याशिवाय राहाणार नाही, असे आमदार धंगेकर म्हणाले.

दरम्यान, धंगेकर यांच्या नाराजीविषयी विचारले असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, बैठक सुरू असताना गणेश बिडकर आले. समान पाणीपुरवठा, मेट्रो, जायका हे सर्व विषय 2017 ते 2022 या बिडकर सभागृहनेते असतानाच्या काळातील आहेत. त्यामुळे बिडकर बैठकीत थोडे बोलले आणि धंगेकर यांच्यापाठोपाठ निघून गेले. बैठकीचा निरोप सर्व आमदारांना होता. आमदार धंगेकर रागावून गेले. हे समजले नाही. बैठकीत धंगेकर यांनी बिडकर इथे कसे? असे म्हणाले नाहीत. मला वाटले त्यांना फोन आला म्हणून ते गेले, असे वाटले. मी चौकशी केल्यानंतर धंगेकर निघून गेल्याचे सांगण्यात आले, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.

Back to top button