नाशिक : यंदा अल निनोचे संकट ; शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

नाशिक : यंदा अल निनोचे संकट ; शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर
Published on
Updated on

नाशिक : गौरव जोशी 

यंदाच्या वर्षी अल निनोचे संकट उभे ठाकल्याने मान्सून जेमतेम असू शकतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण हाेईल, असा इशारा हवामान क्षेत्रातील संस्थांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. दुष्काळाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यासाठी २०१९ मधील दुष्काळी कामांचा अनुभव प्रशासनासाठी उपयोगी ठरत आहे.

देशावर दर चार ते सहा वर्षांमधून एकदा अल निनोचा प्रभाव जाणवतो. अल निनोच्या या संकटामुळे समुद्रातील पाण्याच्या तापमानात काही काळ वाढ होतानाच त्याचा फटका मान्सूनलादेखील बसतो. परिणामी ज्यावर्षी वातावरणात अल निनोचा प्रभाव वाढतो, त्याच्या पुढील वर्षी देशात दुष्काळावर दुष्काळाचे संकट घोंगावते. यापूर्वी २००९, २०१२, २०१५ व २०१८ ही वर्षे भारतासाठी अल निनोची ठरली होती. या चारवर्षी पर्जन्याचे प्रमाण कमी राहिल्याने देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. चालू वर्षदेखील देशासाठी अल निनोचे असू शकते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना पाणीवापराबाबत काटकसरीचे निर्देश देताना दुष्काळाच्या निपटाऱ्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा प्रशासनानेही अल निनोच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नुकतीच विविध विभागांची पाण्याच्या थेंबा-थेंबाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. नाशिक व मालेगाव महापालिकेला पाण्याच्या वापराबद्दल जनजागृतीचे निर्देश देताना जलसंपदा विभागाला सिंचनाच्या आवर्तनाबाबतही फेरनियोजनाच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, २०१९ च्या दुष्काळात प्रशासनाने चांगले काम करत टँकर, नळ पाणीपुरवठा योजना, विहिरी अधिग्रहण आदी उपाययोजना राबविल्या. त्यामुळे दुष्काळातही जिल्हावासीयांच्या हालअपेष्टा कमी होण्यास मदत झाली. यंदाचा संभाव्य धोका लक्षात घेता तो अनुभव प्रशासनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

२०१९ मध्ये ४०५ टँकर

२०१९ मधील दुष्काळी परिस्थितीत निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष झाले होते. त्यावेळी जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तब्बल ४०५ टँकर चालविले होते. त्यासोेबत गावोगावीच्या विहिरी अधिग्रहण करताना पाण्याचे स्रोतही ताब्यात घेतले होते.

जलयुक्त शिवारांतर्गत कामे

२०१८ ला पावसाने पाठ फिरविल्यानंतर पुढील ६ महिने जिल्ह्यात जलयुक्त शिवारांतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे मार्गी लावली गेली. २०१९ जून ते सप्टेंबर याकाळात जिल्ह्यात सरासरीच्या १५७ टक्के पाऊस झाला. याकाळात जलयुक्तच्या कामांमध्ये पाणी साठवणुकीस मदत झाली.

संभाव्य उपाययोजना

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे स्रोत ऑगस्टपर्यंत शाश्वत राहतील याची खात्री करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने यंत्रणांना केल्या. तसेच जुलै ते ऑगस्टसाठी संभाव्य टंचाई कृती आराखडा करणे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी पाणी स्रोत व टँकरचे नियोजन करणे. संभाव्य दुष्काळ लक्षात घेत रोहयोवर कामे उपलब्ध करून देणे. जलजीवन मिशनची कामे जूनपूर्वीच पूर्ण करणे. वन्यप्राण्यांसाठी पाणीपुरवठा आराखड्यासह चारा छावण्यांसाठी संभाव्य नियोजन करायचे आहे.

या आहेत सूचना

-धरणांमध्ये पाण्याच्या पिण्याला प्राधान्य.

-नागरिकांमध्ये पाण्याबाबत जनजागृती करावी.

-गावोगावी हातपंपाची दुरस्ती करून घ्यावी.

-जलसंपदाने सिंचन आवर्तनाचे पुनर्नियोजन करावे.

-रेनवॉटर हार्वेस्टिंगवर भर देणे.

-बोअरच्या परवानगीला बंदी.

हेही वाचा ; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news