पारनेर तालुक्यात ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार | पुढारी

पारनेर तालुक्यात ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : गाव पातळीवर ग्रामरक्षक दल स्थापन करून, त्या माध्यमातून ग्राम सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात येणार आहे. गावाबाहेरील अनोळखी व्यक्ती व गावातील त्रासदायक व्यक्तींची गोपनीय माहिती देण्याबाबत आवाहन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले. येत्या काही दिवसांत सण-उत्सव, तसेच गावातील यात्रा उत्सव होणार आहेत.

त्या अनुषंगाने बाणेर पोलिस ठाण्यात सरपंच, उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्षांची बैठक झाली. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले, गावात यंत्रणा कार्यान्वीत करणे, ग्रामरक्षक दल स्थापन करून त्यांना ओळखपत्रे देण्याबाबत व ग्रामसुरक्षा यंत्रणा सतर्क करून गावात बाहेरील व्यक्ती, अनोळखींची माहिती व त्रासदायक व्यक्तींची गोपनीय माहिती देणेबाबत सर्वाना सूचना करण्यात आली.

तालुक्याची भौगोलिक माहिती घेऊन गावात पोलिस पाटीलांची नियुक्ती संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिले. बैठकी दरम्यान राळेगणसिद्धी, निघोज, कान्हुरपठार, माळकुप, वारणवाडी, गुणोरे, पिंपळनेर आदी गावातील सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. पारनेर तालुका सरपंच समितीने पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा सत्कार केला. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी प्रास्ताविक केले. हनुमान उगले यांनी सूत्रसंचालन केले. जालिंदर लोंढे यांनी आभार मानले.

Back to top button