Nashik Crime : केकचे पैसे मागितल्याने राग ; बेकरी मालकाला कोयत्याने मारहाण | पुढारी

Nashik Crime : केकचे पैसे मागितल्याने राग ; बेकरी मालकाला कोयत्याने मारहाण

नाशिक (सातपूर ) : पुढारी वृत्तसेवा

केक खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याच्या कारणावरून युवकांनी बेकरी मालकावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर डोक्यात दगड मारून मालकाला जखमी केले. सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये शनिवारी (दि.२५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा वाद झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कार्बननाका परिसरातील अभिषेक बेकरीमध्ये सात ते आठ युवक वाढदिवसाचा केक घेण्यासाठी आले. यातील एक युवक केक घेऊन दुकानाबाहेर निघून गेला. बेकरीचालक अनिकेत जाधव यांनी केक घेऊन जाणारा मुलगा तुमच्यामधील आहे का ? असे विचारले. यावर युवकांनी आम्ही केक घेऊन पळून चाललो का, असे प्रतिउत्तर करत वाद घातला व युवकांनी बेकरीचालकावर व बेकरीतील कामगारांना धमकावून मालक अनिकेत जाधव यांच्यावर कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, बेकरीचे मालक अनिकेत जाधव यांनी सातपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेप्रकरणी सातपूर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आहेर करीत आहेत.

कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा

सदर घटना घडली तेव्हा बेकरीमध्ये अनेक ग्राहक होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सातपूर गोळीबाराची घटना ताजी असताना श्रमिकनगर भागात तसेच कार्बन नाका परिसरात युवक कोयता घेत मारहाण करत आहे. रात्री-अपरात्री मोकळ्या मैदानात दारू पार्टी होत आहे. तसेच भररस्त्यात केक कापत, टोळक्याने धिंगाणा, आरडाओरडा करण्याची घटना रोज घडत असल्याचे दिसत आहे. या अशा घटनांवर पोलिस प्रशासन अंकुश लावणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारून पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न निर्माण केला.

हेही वाचा :

Back to top button