नाशिक : जिल्हाधिकारी करणार पांझरपोळची पाहणी, दोन आठवड्यांत देणार राज्य शासनाला अहवाल | पुढारी

नाशिक : जिल्हाधिकारी करणार पांझरपोळची पाहणी, दोन आठवड्यांत देणार राज्य शासनाला अहवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चुंचाळे येथील पांझरपोळच्या जागेवर औद्याेगिक वसाहत उभारण्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. या जागेवरून पक्षांतर्गतच धुसफूस वाढली असताना, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीनंतर दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.

शहरातील अंबड-सातपूर औद्याेगिक वसाहतीत भूखंड उपलब्ध नसल्याने चुंचाळे येथील सुमारे ९०० एकर जागेवर नवीन वसाहत उभारण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. यात आमदार देवयानी फरांदे व उद्योजक सहभागी झाले होते. ही जागा पांझरपोळची असून, भू-संपादन कायद्यांतर्गत ती संपादित करून तेथे एमआयडीसी वसविण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बैठकीला डावलले गेल्याने नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी नाराजी व्यक्त केली, तर भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांचा या वसाहतीला विरोध आहे. त्यामुळे या जागेवरून भाजप अंतर्गत कलह वाढला आहे. या सर्व प्रकारांत जिल्हाधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चुंचाळे परिसरातील प्रस्तावित जागेवरील वृक्षसंपदा तेथील सध्याच्या परिस्थिती, त्या भागातील जनावरांचे गोठे व त्यातील जनावरांची संख्या यासह अन्य माहिती गोळा केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वृक्षांच्या गणनेसाठी कृषी विभागाची मदत घेताना ड्रोनच्या सहाय्याने छायाचित्रे गोळा करण्यात येणार आहेत. तेथील सर्व बाबींचा अभ्यास करून त्यानुसार येत्या पंधरवड्यात वस्तुनिष्ठ अहवाल सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

जनावरांच्या चरण्यासाठी वृक्षलागवड

चुंचाळेतील ही जमीन शासनाची नसून ती पांझरपोळची असल्याची समजते. तेथील जमिनीवर पांझरपोळकडून जनावरांना चरण्यासाठी गवत लावले आहे. त्यासोबत अन्य वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले आहे. या भागात अडीच लाखांहून अधिक वृक्षसंपदा असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button