

नगर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतींच्या मासिक सभांना सहा महिने गैरहजर राहिल्यास सदस्यत्व काढून घेतले जाऊ शकते. राहुरी खुर्द तसेच दुधोडी ग्रामपंचायतींच्या दोन महिला सदस्यांना सभेला न जाणे महागात पडले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या दोन सदस्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश काढले आहेत.
पंचायतीच्या पूर्वपरवानगी शिवाय सहा महिने ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना गैरहजर राहिल्यास तो सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतो, असा नियम आहे. या नियमाने राहुरी व कर्जत तालुक्यातील दोन सदस्यांवर सुनावणी सुरू होती. दरम्यान, सुनावणीनंतर राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या संबंधित सदस्या सविता भरत धोत्रे, तसेच कर्जत तालुक्यातील दुधोडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सीमा प्रदीप जांभळे यांना अपात्र ठरविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी काढले आहेत.