नाशिक : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील संशयितांची धिंड | पुढारी

नाशिक : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील संशयितांची धिंड

नाशिक (पंचवटी) : पुढारीे वृत्तसेवा

पेठ रोड, फुलेनगर परिसरात शनिवारी (दि. ११) एका युवकावर तीन संशयितांनी जीवघेणा हल्ला केला होता. यावेळी बंदुकीचा वापर करून गोळीबारदेखील करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी फरार होते. त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्यानंतर त्यांची पोलिसांनी मंगळवारी (दि. २१) फुलेनगर परिसरातून धिंड काढली. परिसरातील नागरिकांच्या मनातील दहशत कमी व्हावी या उद्देशाने पोलिसांनी संशयित तिघा आरोपींची घटना घडल्या ठिकाणाहून धिंड काढली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, फुलेनगर भागातील मुंजोबा चौक येथे प्रेम महाले हा आपल्या मित्रासोबत उभा होता. याच वेळी त्याठिकाणी संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, संदीप आहिरे, जय खरात यांनी त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. हा हल्ला चुकवून प्रेम महाले याने घराकडे धाव घेतली होती. संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करून महाले याच्या घराच्या दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबारदेखील केला होता. यावेळी महाले याच्या आईच्या अंगाला गोळी चाटून गेल्याने यात त्या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत घटनेतील संशयित विशाल ऊर्फ विकी विनोद वाघ, जय संतोष खरात, संदीप आहिरे या तिघांना ताब्यात घेतले आहे. तर विकी वाघ याच्याकडून अंगझडतीत एक गावठी पिस्तूलदेखील मिळून आले होते. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून केल्याचे संशयितांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

त्यानंतर नागरिकांच्या मनातून संशयितांची दहशत कमी व्हावी, या उद्देशाने पोलिसांनी या तिघांची घटनास्थळी नेऊन परिसरातून धिंड काढली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक रणजित नलावडे, पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button