पुणे : ड्रेनेजसाठी 1200 कोटी समाविष्ट गावांसाठी विकास आराखडा | पुढारी

पुणे : ड्रेनेजसाठी 1200 कोटी समाविष्ट गावांसाठी विकास आराखडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी ड्रेनेज लाईन आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा (एसटीपी) समावेश असलेला विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे एक हजार 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. या कामाची पॅकेजेस करण्यात येणार असून, जायका व अन्य शासकीय योजनांतूनही यासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महापालिकेमध्ये दोन वर्षांपूर्वी 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांच्या समावेशामुळे महापालिकेची मोठ्या प्रमाणात हद्दवाढ झाली आहे. या गावांच्या समावेशानंतर महापालिकेने समान पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईनसारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पावले उचलली आहेत.

या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी पॅकेजेस करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासोबतच गावांमधील सांडपाणी गोळा करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे 1 हजार 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये ड्रेनेज लाईनसोबतच सहा ठिकाणी मैलापाणी प्रक्रिया केंद्र प्रस्तावित केली आहेत.समाविष्ट केलेली गावे ही महापालिकेच्या चारही बाजूंना लागून असल्याने विभागवार पॅकेजेस तयार करून स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहेत. नदी सुधार योजनेसाठी जायका कंपनीकडून महापालिकेला अनुदानित स्वरूपात 900 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. समाविष्ट गावांतील ड्रेनेज लाईनसाठी अर्थसाहाय्य व्हावे, यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीसाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

औषध फवारणीसाठी 1 कोटीचे वर्गीकरण
महापालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुन्या असा साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डास आळीनाशक पायरी प्रॉक्सीफेन 0.5 जीआर (ग्रॅन्युअल) औषध फवारणीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Back to top button