नाशिक : शेतकर्‍यांच्या आक्रोशानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा अंधारात पाहणी दौरा! | पुढारी

नाशिक : शेतकर्‍यांच्या आक्रोशानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा अंधारात पाहणी दौरा!

नाशिक (उगाव) : पुढारी वृत्तसेवा
कुंभारी, पंचकेश्वर शिवारात तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस गारपीट झाली. शेतकर्‍यांच्या वाढत्या आक्रोशानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी (दि. 21) सायंकाळी 6:45 वा शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. अत्यंत धावत्या दौर्‍यात मंत्र्यांनी नुकसान झालेल्या द्राक्ष, भोपळा या पिकांची पाहणी केली. सत्तार आले अन चर्चा करुन गेले, अशी संतप्त भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

शेतकरी संवादादरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्नशील आहे, त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजी करू नये. नुकसान भरपाई देण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. परंतु, काही शेतकरी अक्षरशः संतप्त झाले होते. आपण नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन देता मात्र भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आम्हाला गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संतप्त शेतकर्‍यांनी केली. आधीच मोठे नुकसान झाले असताना मंत्रीमहोदय अंधारात दौरा करुन बोळवण करत अल्याचा आरोपही याप्रसंगी शेतकर्‍यांनी केला राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवावी. केवळ शेतकर्‍यांच्या जमीनींचे लिलाव करण्याचा धडाका लावु नये, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. स्थानिक शेतकरी ज्ञानेश्वर घंगाळे,द्त्तात्रय सुडके ,विलास मंडलिक , शिवलाल ढोमसे द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले यांनी अडचणी समस्या मांडत कृषीमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी ज्ञानेश्वर घंगाळे या शेतकर्‍याने क्राँप कव्हरला अनुदान अन बँकांचे वसुलीचे तगादे यावर पोटतिडकिने उपाय करण्याची मागणी केली.

हेही वाचा:

Back to top button