नाशिक : गारपीटीने हिरावला बळीराजाचा घास | पुढारी

नाशिक : गारपीटीने हिरावला बळीराजाचा घास

नाशिक (उगांव, ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा
निफाडच्या उत्तर भागातील पंचकेश्वर कुंभारीसह ब्राम्हणगांव वनसगांव भागात शनिवारी, दि.18 सायंकाळी झालेल्या गारपीटीने द्राक्ष कांदा शेतीला मोठा फटका बसला आहे. तर रविवार, दि.19 सकाळपासून द्राक्षपंढरीत नेत्यांच्या भेटीगाठी अन् पंचनामे करण्याची मागणी शासन दरबारी रेटा लावण्याचा शब्द यातच शेतकरी अन‌ नेत्यांचा संवाद झाला.

शनिवारी, दि.18 सायंकाळी गारांचा पाऊस झाल्याने कुंभारी पंचकेश्वर शिवारातील गारा ह्या सुपारीसारख्या आकाराच्या असल्याचे  शेतकऱ्यांनी सांगितले. गारांमुळे तयार झालेला द्राक्षबागेचे नुकसान झाले. घर, आंगण, शेत शिवारात गारांचे आच्छादन पसरले. तर सुमारे दोन तासांनंतरही गारा तशाच शेतशिवारात पडु‌न राहील्याने द्राक्षे, कांदा, मका, गहू या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. रानवड, ब्राम्हणगांव, वनसगांव, उगांव, नांदुर्डी शिवारातील द्राक्ष, कांदा, गहू, मका, कोथंबीर, भोपळा या पिकांचे गारपीट अन् पावसाने संपूर्णपणे नुकसान झाले आहे. नुकसानीची मोठी झळ द्राक्षपंढरीला बसली आहे.

थाॅमसन, आर के सोनाका या द्राक्षमालाचे परिपक्व झालेली बाग डोळ्यादेखत गारपीटीत चिरडली गेली आहे. तर अंगणात मळणी करुन ठेवलेल्या गव्हाच्या राशीवर बर्फाची झालर तयार झाली. जमीनीवर एक मिनिट देखील उभे राहता येणार नाही. एवढा थंडावा आला  आहे. वर्षभराच्या मेहनतीचे चीज होण्याची वेळ आली असताना काळ बनून गारांचा मारा झाल्याने  शेतकरी अक्षरशः कोलमडून गेला आहे. – ज्ञानेश्वर घंगाळे, शेतकरी.

* गारपीटग्रस्त भागातील शेतजमीनीवर सुमारे दोन तास गारांचा थर पडून होता. यामुळे द्राक्षवेलीची मुळे ,पेशी पुर्णपणे बंद पडून द्राक्षवेलीच्या वाढीवर त्याचे दुरगामी परिणाम होण्याचा धोका वाढला आहे. द्राक्षवेलीवर शिल्लक राहिलेल्या द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत. यात सुर्यप्रकाश पडल्यावर आणखी वाढ होऊन नुकसानीची तीव्रता अधिक वाढत आहे.

निफाड www.pudhari.news
निफाड : गारांच्या मारामुळे द्राक्षमणींना अशाप्रकारे फटका बसला आहे.

* निफाडच्या गारपीटग्रस्त भागात माजी आमदार अनिल कदम यांच्यासह महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले नाशिक विभाग अध्यक्ष ॲड रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख यांच्यासह संचालक मंडळाने पाहणी करुन नुकसानीच्या तीव्रतेची पाहणी केली.

* तयार परिपक्व झालेल्या द्राक्षमालाचा सौदा व्यापाऱ्यासोबत केलेला असतांना गारपीटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मार्च एण्डचा बँकांचा कर्जवसुलीचा ससेमिरा अन् वर्षभराच्या मेहनतीने पिकविलेल्या पिकांची राखरांगोळी यामुळे शेतकरी अक्षरशः खचून गेला आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन कर्जवसुलीचे तगादे थांबविण्याची मागणी केली आहे.

अवकाळीतून द्राक्षमाल वाचविण्यासाठी द्राक्षबागेला क्राॅप कव्हर हाच एकमेव पर्याय आहे. मात्र त्याच्या उभारणीसाठी येणारा खर्च हा सामान्य शेतकऱ्याच्या अवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शासनाने मागेल त्याला क्राप कव्हर योजना पन्नास टक्के अनुदान तत्वावर राबवावी. तसेच गारपीटग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करुन बँकांची कर्जवसुली थांबवावी. – कैलासराव भोसले, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष.

हेही वाचा:

Back to top button