पिंपळनेर : कायदा सुव्यवस्थेसाठी शहरात रॅपीड ॲक्शन फोर्स | पुढारी

पिंपळनेर : कायदा सुव्यवस्थेसाठी शहरात रॅपीड ॲक्शन फोर्स

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
सी कम्पनी १०२ बटालियन रेण्डी ॲक्टान फोर्स नवी मुंबई येथील सहायक पोलिस आयुक्त  संजय कुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र प्रसाद पटेल यांच्यासह सुशील कुमार व एकूण ६० जवान यांनी परिचय अभ्यास हेतूपुरस्सर पिंपळनेर पोलिस ठाणे येथे भेट दिली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक भाईदास माळचे, प्रदिप सोनवणे, भूषण शेवाळे, एस.पी.पटेल यांनी पोलिस ठाणे हद्दीतील संवेदनशील स्थळे, धार्मिक स्थळे, महत्वपूर्ण स्थळे, दवाखाने, शाळा, लोकसंख्या, जातिनिहाय टक्केवारी आदीबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यासह पिंपळनेर पोलिस ठाणे येथील समुहाने मिळून रॅपीड ॲक्शन फोर्सच्या जवानांबरोबर शहरातील महत्वपूर्ण आणि संवेदनशील स्थळांचा रुट मार्च केला. रॅपीड ॲक्शन फोर्स हे १५ ते २१ मार्च या कालावधीत धुळे जिल्हयात तैनात राहणार आहे. या कालावधीत रॅपीड ॲक्शन फोर्स जिल्हयाची एकंदरीत सविस्तर माहिती घेऊन संग्रहीत करणार आहे. तथा त्यााबाबतचा अहवाल दिल्ली कार्यालयास पाठवणार आहे. जेणेकरून आपत्कालीन, संकटसमयी जनतेच्या मदतीस सुरक्षा बल लवकरात लवकर सज्ज होऊ शकणार आहे. शांतता कमिटीची बैठक असिस्टंट कमांडर नवी मुंबई संजयकुमार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये त्यांनी सांगितले की, राज्यात भाईचारा व जातीय सलोखा ठेवला पाहिजे, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था उत्तम राखली जाते व समाजात तेढ निर्माण होत नाही. गावात कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त प्रकार घडत नसून हिंदू, मुस्लिम एकोप्याने राहतात ही भूषणावह बाब आहे. असे सांगून गावकऱ्यांचे कौतुक केले. भाईदास मालचे यांनी येणारे सण व उत्सव सर्वांनी आनंदात व गुण्यागोविंदात साजरे करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे यांनी पिंपळनेर येथील नागरिक व येथे होणारे सण उत्सव कसे निर्विघ्नपणे साजरे केले जातात या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर पथकाने पिंपळनेर शहरातील इंदिरानगर, रामनगर, माळी गल्ली, गांधी चौक, बाजारपेठ, नाना चौक, गोपाल नगर, सटाणा रोड मार्गे बस स्टॉप चौफुली, सामोडा चौफुली परिसरातील रस्त्यावरून संचलन केले. त्यांच्यासोबत पिंपळनेर पोलीस, गृहरक्षक दल यांनी देखील संचालन केले. यावेळी सदस्य सरपंच देविदास सोनवणे, माजी पं.स.सदस्य ज्ञानेश्वर एखंडे, वसंतराव बच्छाव, प्रमोद गांगुर्डे, सुभाष जगताप, राजेंद्र गवळी, मुन्ना जैन, रामदास गवळे, राजेंद्र माळी, बापू माळी, कन्हैयालाल माळी, विशाल गांगुर्डे, भरत बागुल, हाजी जावेद सैय्यद, अय्युब पठाण, नौशाद सैय्यद, लियाकत सैय्यद, जाकीर शेख, आसिफ सैय्यद, टीनू वाघ, भरत मोरे, डॅनियल कुवर, मुन्ना मिस्त्री, मुन्ना फिटर यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. भाईदास माळचे यांनी आभार मानले.

हेही वाचा:

Back to top button