पिंपरी शहरात एच 3 एन 2 चा पहिला बळी; ज्येष्ठाने गमावले प्राण | पुढारी

पिंपरी शहरात एच 3 एन 2 चा पहिला बळी; ज्येष्ठाने गमावले प्राण

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात एन्फ्लुएंझा ए-एच 3 एन 2 विषाणूच्या संसर्गामुळे 73 वर्षीय ज्येष्ठाचा गुरुवारी (दि. 16) सकाळी मृत्यू झाला. एच 3 एन 2 मुळे झालेला हा शहरातील पहिला मृत्यू आहे. शहरात आत्तापर्यंत या आजाराची एकूण 4 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी तिघे बरे झाले आहेत.

भोसरी येथील संबंधित ज्येष्ठ व्यक्तीला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत 7 तारखेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) त्यांचे ’स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना एच 3 एन 2 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ज्येष्ठाला ह्दयविकार आणि दम्याचा देखील त्रास होता.

महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, महापालिकेकडे 5 मोठ्या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग व अन्य यंत्रणा तयार आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 10 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, दमा अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. आजार अंगावर काढू नये. तसेच, या आजाराबाबत घाबरुन जाण्याचे कारण नाही. या आजारावर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधोपचार उपलब्ध आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच, आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा.

Back to top button