नाशिक : विजेच्या धक्क्यात शेतकरी पितापुत्राचा मृत्यू

नाशिक : विजेच्या धक्क्यात शेतकरी पितापुत्राचा मृत्यू

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : शेतात काम करत असताना पित्रा – पुत्राचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४) सकाळी ११च्या सुमारास तालुक्यातील खडकी शिवारात घडली. पंढरीनाथ पांडुरंग कळमकर (५८) व समाधान पंढरीनाथ कळमकर (२८) असे मृत पित्रा-पुत्राचे नाव आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी शिवारात कळमकर यांची शेतजमीन आहे. तेथील कांदा काढणीसाठी सहकुटुंब शेतात गेले होते. दरम्यान, समाधान हा विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला. तेथील विद्युत पेटीतील आर्थिंग वायर तुटलेली दिसल्याने ती व्यवस्थित बाजुल ठेवण्यासाठी गेला असता त्याला विजेचा धक्का बसला, हा प्रकार पाहून वडिल पंढरीनाथ हे घटनास्थळी धावले. मुलाला सावरण्यात त्यांनाही विजेचा धक्का बसला.

यात दोघांचा मृत्यू झाला. कुटुंबिय आणि आजुबाजुच्या शेतकर्‍यांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मालेगावच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सायंकाळी उशिरा पितापुत्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार वर्षांपूर्वी समाधानच्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेत बापलेकही दगावल्याने घरात एकही कर्ता पुरुष राहिला नाही. कुटुंब पोरके झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news