मोठी बातमी: पुण्यातील कोयता टोळीचा म्होरक्या गजाआड; झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी | पुढारी

मोठी बातमी: पुण्यातील कोयता टोळीचा म्होरक्या गजाआड; झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गुलटेकडीतील ओैद्योगिक वसाहतीत दहशत माजविणार्‍या कोयता टोळीचा म्होरक्या सचिन माने याला स्वारगेट पोलिसांनी पकडले. माने याच्यासह नऊ साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कोयते, तलवार, पालघन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ज्या परिसरात टोळक्याने दहशत निर्माण केली तेथेच त्यांची पोलिसांनी धिंड काढली.

सचिन परशुराम माने (वय 24) असे त्याचे नाव आहे. यापुर्वी त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. मानेसह त्याच्या साथीदारावर पोलिसांनी मोक्का अंतर्गत नुकतीच कारवाई केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुलटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील (मीनाताई ठाकरे वसाहत) वर्चस्वाच्या वादातून सचिन माने आणि साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील प्रकाश पवार आणि साथीदारांवर कोयत्याने वार केले होते. माने आणि साथीदारांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली होती. तोडफोड करुन आरोपी माने साथीदारांसह पसार झाला होता. पसार झालेला माने घोरपडे पेठेत मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी पहाटेच्यावेळी सापळा लावुन मानेला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर कोयता उगारला. झटापटीत पोलीस कर्मचारी शिवा गायकवाड जखमी झाले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, सोमनाथ गायकवाड, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारु, शिवा गायकवाड, अनिस शेख, दीपक खेंदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण यांनी ही कारवाई केली.

माने याने ओैद्योगिक वसाहतीत एसएम कंपनी नावाने गुन्हेगारी टोळी सुरु केली होती. त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी असे गंभीर गुन्हे स्वारगेट, सहकारनगर, मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती. त्याला वर्षभरासाठी येरवडा पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते.

Back to top button