ठाणे : आमदार केळकरांच्या आरोपांमुळे शिंदे गटात पुन्हा अस्वस्थता | पुढारी

ठाणे : आमदार केळकरांच्या आरोपांमुळे शिंदे गटात पुन्हा अस्वस्थता

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार असताना ठाण्यात मात्र भाजप आणि शिंदे संबंध अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात ठाणे महापालिकेने केलेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाला. असा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणीच आमदार केळकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली आहे. केळकर यांच्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे असून या संपूर्ण प्रकरणाकडे आता राज्यातील नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील कोपरी परिसरात महापालिकेने केलेली काही विकासकामे दर्जाहिन तसेच त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी प्रभागात कोट्यावधी रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक व विविध सुशोभीकरणाची विकास कामे करण्यात आली आहेत. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदारांना कामे न करताच देयके अदा केल्याचा आरोप करीत केळकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या चर्चेत भाग घेताना केला आहे. सदर गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून एका महिन्याच्या आत समितीचा अहवाल सादर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

झालेली कामे वास्तव व वस्तुस्थिती याबाबत आमदार केळकर यांनी कामांचा पाढाच वाचला. यामध्ये गैर व्यवहार कसा झाला हे सप्रमाण दाखवून दिले. यावेळी उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांनी लिहिलेली उत्तरे दिल्यानंतर अधिकाऱ्यांची ही उत्तरे चुकीचे असून दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केळकर यांनी केला. सदरची माहिती चुकीची असल्यास हक्कभंग सारखे आयुध वापरून पुन्हा हाच विषय आपण सभागृहात आणू शकता असा सल्ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिला. या संपूर्ण कामांची चौकशी आयुक्त करत असून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी उदय सामंत यांनी दिले.

Back to top button