नाशिक : भूमिअभिलेख' बनले लाचखोरीचे कुरण, दोन कर्मचाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला अटक | पुढारी

नाशिक : भूमिअभिलेख' बनले लाचखोरीचे कुरण, दोन कर्मचाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयामध्ये भ्रष्टाचार बोकाळल्याने हे कार्यालय लाचखोरीचे कुरण बनले आहे. तीन लाखांच्या लाच प्रकरणी त्र्यंबकेश्वर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दौलत नथू समशेर (शिरस्तेदार), भास्कर प्रकाश राऊत (भूकरमापक), वैजनाथ नाना पिंपळे (खासगी व्यक्ती) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात दौलत समशेर व भास्कर राऊत कार्यरत आहेत. पत्नीच्या नावे असलेल्या मौजे तळेगाव येथील क्षेत्राशेजारील क्षेत्राची फायनल लेआउटसाठी मोजणी करताना तक्रारदारांचे क्षेत्र सरकू न देण्याच्या मोबदल्यात समशेर व राऊत यांनी १० लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती ६ लाखांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराच्या तक्रारीच्या पडताळणीसाठी वैजनाथ पिंपळे यांच्या मखमलाबाद येथील मोजणी व बांधकाम व्यससायाच्या ऑफिस परिसरात एसीबीने सापळा रचला.

समशेर व राऊत यांच्या वतीने तडजोडअंती ३ लाख रुपये लाच स्वीकारण्याचे पिंगळे यांनी मान्य केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले. त्याआधारे तिघा संशयितांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान तीघा लाचखोरांना जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

सव्वा महिन्यात तीन कारवाया

१ फेब्रुवारी : ५० हजारांची लाच स्वीकारताना नाशिकचे जिल्हा अधीक्षक तथा अतिरिक्त कार्यभार उपसंचालक महेशकुमार महादेव शिंदे व कनिष्ठ लिपिक अमोल भीमराव महाजन अटकेत.

२७ फेब्रुवारी : ४० हजारांची लाच घेताना नाशिक भूमिअभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपिक नीलेश शंकर कापसे जाळ्यात.

९ मार्च : ३ लाखांच्या लाचप्रकरणी त्र्यंबकेश्वर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचे शिरस्तेदार दौलत नथू समशे, भूकरमापक भास्कर प्रकाश राऊत आणि खासगी व्यक्ती वैजनाथ नाना पिंपळे यांना अटक.

हेही वाचा :

Back to top button