नाशिक : पिकाच्या नासडीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त | पुढारी

नाशिक : पिकाच्या नासडीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
कांदा उत्पादकांचे वांधे थांबत नसताना अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने हजारो शेतकर्‍यांभोवती कर्जाचा फास आणखी घट्ट झाला आहे. कांद्याने धोका दिल्याने अनेकांनी टोमॅटोची लागवड केली आणि तो काढणीस आला असताना वादळी पावसाने त्याचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाने उभ्या टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे.

लासलगावजवळील वाकी खुर्द येथील शेतकरी संतोष देवडे यांची दोन एकर शेती असून एक एकर शेतात 60 ते 70 हजार रुपये खर्च करत लाल कांद्याचे पीक घेतले होते. पीक जोमदार आले. कांदा काढणीला सुरुवात झाली आणि दुसरीकडे कांद्याचे बाजारभाव दररोज कोसळण्यास सुरुवात झाली. त्यात वाहतूक आणि शेतातून कांदा काढणीचा विचार केला, तर एक लाख रुपयांपर्यंत खर्च गेला. हाती 50 हजार रुपये येऊन 50 हजार रुपयांचा तोटा झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, घेतलेले कर्ज कसे फेडावे, मुलांचे शिक्षण कसे करावे, या विवंचनेत असताना पत्नी शैलाने सांगितले की, एक लाख रुपये कर्ज घेत टोमॅटोचे पीक घेतले. पण दोन दिवसांपूर्वीच्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने जोमदार आलेले टोमॅटोचे पीक भुईसपाट झाल्याने देवडे कुटुंबासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने मदत करावी, अशी मागणी हे कुटुंब करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button