नाशिक : मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने वांगी पिकावर फिरवला रोटर | पुढारी

नाशिक : मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने वांगी पिकावर फिरवला रोटर

नाशिक (लोहोणेर)  : पुढारी वृत्तसेवा
शेतीचा कोणताही हंगाम समस्यांशिवाय जात नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काही दिवसांपासून शेतीमालाला बाजारभाव हुलकावणी देत आहे. कांदा, मेथी, कोबी या पिकांसोबत भाजीपाला ही खर्च भरुन काढू शकला नाही. या दुष्टचक्रात सावकी येथील शेतकरी धनंजय अशोक बोरसे यांनी आपल्या 20 गुंठे क्षेत्रावरील वांगी पिकावर रोटर फिरवला.

बोरसे यांनी गट नंबर 605 मध्ये अर्धा एकर क्षेत्रावर तीन महिन्यांपूर्वी वांग्याची लागवड केली होती. महिनाभरापासून उत्पादन सुरू झाले. मात्र हाती काहीच पडले नाही. बाजारात माल घेऊन जाणेदेखील खर्चिक ठरत असल्याचे पाहून त्यांनी पिकावर रोटर फिरवत वांगी त्याच शेतात मिसळली. जिल्हाभरात बाजारभावाने त्रस्त शेतकरी वेगवेगळ्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडत आहेत. कुणी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवतात, कुणी पिकात जनावरे सोडली, कांदा पिकाची होळीदेखील केली. पेरणी, लागणी, मशागत, औषध फवारणीचाही खर्च वसूल होत नसल्याची ओरड आहे. त्यातच अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतल्याने कृषी क्षेत्रावर अवकळा पसरली आहे. 25 ते 30 हजार रुपये खर्चून भाजीपाला पीक घेतले. मात्र वांगीला फक्त एक रुपये बाजारभाव मिळतोय. ते विकण्याचे श्रम का करायचे म्हणून शेवटी बोरसे यांनी पिकावर रोटर फिरवण्याचा निर्णय घेतला. शेतकरी वर्गातून बाजारभावप्रश्नी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

हेही वाचा:

Back to top button