तृणधान्य निर्यातीतून देशाला ८२ हजार कोटींचे परकीय चलन | पुढारी

तृणधान्य निर्यातीतून देशाला ८२ हजार कोटींचे परकीय चलन

लासलगाव (जि. नशिक) : राकेश बोरा

आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा पार करत वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या ९ महिन्यांत भारताने तांदूळ आणि तृणधान्य निर्यातीत उल्लेखनीय वाढ नोंदविली आहे. मागील वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांच्या तुलनेत २१ टक्के बासमती, बिगर बासमती तांदूळ, गहू व इतर तृणधान्य निर्यातीत वाढ करत देशाने ८२ हजार ४१६ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवले.

भारताच्या कृषी उत्पादनांचे सर्वांत मोठे आयातदार देश अमेरिका, चीन, बांग्लादेश,आखाती देश, व्हिएतनाम, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, नेपाळ, इराण आणि मलेशिया हे आहेत. या सर्व देशांपैकी बहुतांशी देशात केल्या जाणाऱ्या निर्यातीत वाढ झाल्याचे आढळले असून, तृणधान्याच्या निर्यातीतही प्रगती झाली. भारताने या काळात एकाच वेळी अनेक देशांमध्ये निर्यात केली. त्याचप्रमाणे गव्हाची निर्यात येमेन, इंडोनेशिया, भूतान इत्यादी देशांमध्ये आणि इतर, तृणधान्ये, सुदान, पोलंड आणि बोलिव्हियाला केली.

भारत हा तांदळाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. भारतातून 150 देशांमध्ये तांदळाची निर्यात केली जाते. भारताच्या तांदळाला जगातील अनेक देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यावर्षी तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिका, इराण, येमेनसह इतर देशांमध्ये भारताच्या तांदळाला मोठी मागणी आहे. तांदळाच्या उत्पादनात जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत हा तांदळाचा सर्वांत स्वस्त जागतिक पुरवठादार देश आहे. देशी तांदळाच्या वाणांना असलेली मागणी वाढत चालली आहे. त्यातच त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांची निर्यातही वाढत आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत अनेक संस्थांमध्ये संशोधन केले जात आहे. देशी तांदळाची गुणवत्ता आणि सुगंध राखण्याबरोबरच उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जात आहे. याचाच परिणाम म्हणून देशातून तांदूळ आणि इतर तृणधान्य निर्यातीत लक्षणीय वाढ होत देशाला तांदूळ, गहू इतर तृणधान्य निर्यातीतून ८२ हजार ४१६ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे.

हेही वाचा :

Back to top button