महिला दिन विशेष : मनातील हळवा कोपरा बाजूला ठेवत इतरांसाठी जगणाऱ्या ‘वीरांगणा’ | पुढारी

महिला दिन विशेष : मनातील हळवा कोपरा बाजूला ठेवत इतरांसाठी जगणाऱ्या 'वीरांगणा'

नाशिक : दीपिका वाघ

जवानासोबत लग्नगाठ बांधणाऱ्या महिलांचे जग फार छोटे असते. पतीच्या सुट्टीच्या काळात भरभरून जगून घ्यायचे आणि उरलेले दिवस आठवणींच्या भरवशावर काढून पुन्हा सुट्टी कधी येईल याची वाट बघत बसायची. घरात खणखणारा फोन काही वाईट बातमी घेऊन तर नाही येणार ना, असे बेभरवशाचे आयुष्य जगणाऱ्या महिलांची अवस्था त्याच जाणू शकता.. वीरांगणा म्हणजे युद्धाला सामोरी जाणारी वीरा. देशासाठी आयुष्य कुर्बान करणाऱ्या शहीद जवानाची पत्नी, माता एका संस्थेच्या मदतीने एकत्र आल्या आणि मनातील हळवा कोपरा बाजूला ठेवत इतरांसाठी आयुष्य जगायला शिकल्या.

वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्था ही महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे जी शहीद जवानांच्या पत्नी, मातांसाठी सुरू करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षा रेखा खैरनार सांगतात, आमचे काम पूर्वीपासून सुरू होते पण त्याला नाव मिळावे म्हणून वर्षभरापूर्वी आम्ही संस्थेची नोंदणी केली. संपूर्ण महाराष्ट्रातील आम्ही ३०० वीरनारी, वीरमाता एकत्र आलो आणि एकमेकांना मदत करायला सुरुवात केली. आदिवासी शाळा दत्तक घेऊन शहीद दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना वर्षभर पुरेल अशा वस्तूंचे वाटप आम्ही करायला सुरुवात केली. शहीद जवानाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या नावाने वृक्षलागवड करतो. वृक्षाच्या रूपाने त्या जवानाची आठवण कायम सोबत राहते. अशा एकूण २०० वृक्षांची लागवड आम्ही केली आहे. शहीद झाल्यानंतर सासू-सुनेत काही आर्थिक वाद निर्माण झाला तर त्याची सोडवणूक केली जाते. पेन्शन मंजुरीला अडचणी आल्या तर जिल्हा सैनिक कार्यालय किंवा त्या युनिटला कळवून ती अडचण दूर केली जाते. बर्फाळ प्रदेशात सेवा बजावताना ऑक्सिजनअभावी जे जवान मृत्युमुखी पडतात त्यांना शहीद घोषित केले जात नाही त्यांचा संघर्ष वेगळा असतो. संस्थेतील सर्व महिला स्वखर्चाने एकत्र येऊन इतरांसाठी आयुष्य जगतात. आम्हाला पेन्शन मिळते त्यामुळे महिन्याला हजार दोन हजार खर्च करावे लागले तरी हरकत नसल्याचे त्या अभिमानाने सांगतात.

पहिला मान वीरमातेला..

ज्या मुलाला जन्म दिला त्याच मोठ्या झालेल्या मुलाला शहीद झालेले बघताना त्या वीरमातेची अवस्था काय होत असेल? त्यासाठी लग्न न झालेल्या शहिदांच्या मातेला संस्थेतील सर्व महिला आई म्हणूनच हाक मारतात. कोणत्याही कार्यक्रमात पहिली खुर्ची आईसाठी राखीव ठेवलेली असते. आई मुलाचे दु:ख तर विसरू शकत नाही पण आई म्हणून हाक मारल्यावर आपला मुलगा इथेच कुठेतरी असल्याची जाणीव त्या वीरमातेला नक्कीच होत असणार, हा त्यामागचा हेतू.

हेही वाचा :

Back to top button