

रत्नागिरी : जान्हवी पाटील : मुलींनी हाफ पॅन्ट टी-शर्ट घालून कुस्तीच्या आखाड्यात उतरणे म्हणजे संस्कारी नसणे, हा गैरसमज अजूनही बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळतो. कुस्ती खेळल्याने मुलगी ही मुलगीप्रमाणे दिसत नाही, असेही म्हणतात मात्र हा केवळ गैरसमज आहे, आज मी अनेक कुस्ती स्पर्धा खेळले, त्यातूनही नुकतेच भारताचा पहिला मिक्स मार्शल आर्ट रिअॅलिटी शोचे विजेतपदही पटकावले मला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावायचे असल्याचे उद्गार राष्ट्रीय कुस्तीपटू मोनिका घाग हिने काढले.
मुळात आज महिला अनेक क्षेत्रात आहेत. क्रीडा क्षेत्रातही मुलींची मक्तेदारी आहे. मात्र, अजूनही कुस्तीच्या आखाड्यात खेळणारी मुली फार कमी आहेत. कुस्ती हे पुरुषांचे क्षेत्र मानले जाते, हे अतिशय चुकीचे आहे, कुस्ती खेळणारी मुलगी स्वयंपूर्ण होतेच. त्याचबरोबर तिचा आत्मविश्वास खूप वाढतो, अशी माहिती मोनिका घाग हिने दिली.
मी लहानपणापासून असे काही ठरवले नव्हते. मात्र, मला कॉलेज जीवनात बॉक्सिंगची आवड होती. यातूनच मी २०१७ ला कुस्तीकडे वळले आणि यातूनच आपल्यामध्ये कुस्तीची आवड निर्माण झाली. याचवेळी रत्नागिरीचे कुस्तीपटू किरण घाग यांच्याशी ओळख झाली आणि लग्न झाले. त्यानंतर मी चिपळूणची सून झाले आहे. कोकणात कुस्ती खेळणाऱ्या मुलींची संख्या नगण्य आहे. या ठिकाणी काही ठराविक खेळांना मुली प्राधान्य देतात असे मला रत्नागिरीत आल्यानंतर कळले. आज माझी सासरची मंडळी विशेषत: पती किरण घाग यांच्यामुळे मी कुस्तीच्या स्पर्धा खेळते, असेही मोनिकाने आवर्जून सांगितले.
मोनिका किरण घाग हिने महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेत वैयक्तिक पदके मिळवली आहेत. दोनवेळा कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याचप्रमाणे वुशू या खेळामध्ये तिने राज्यस्तरावर २ वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. इतकेच नव्हे तर सा साऊथ एशियान ब्राझिलियन जिउजित्सू स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.