नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला | पुढारी

नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

रामकुंड परिसरात मंगळवारी (दि.७) सायंकाळी वीरांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांनी केलेल्या विविध महापुरुषांच्या वेषभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांनी रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

होळी सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला वीर नाचविण्याची परंपरा आहे. घरोघरी देव्हाऱ्यात असलेले वीरांचे टाक खोबऱ्याच्या वाटीत ठेवून व लाल कापडात बांधून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यानुसार यंदाही मंगळवारी सायंकाळी वाजतगाजत विविधरंगी वेषभूषा करून लहान मुलांच्या मिरवणुका रामकुंडाच्या दिशेने येत होत्या. येथील होळीभोवती पाच प्रदक्षिणा करून नंतर रामकुंडात गोदापूजन करून चिमुकले व भाविक माघारी फिरत होते. पारंपारिक वाद्यांच्या गजरात हाती घेतलेले हे वीर विशिष्ट प्रकारचा नाच करीत होळी भोवती फेर धरत होते. यानंतर घरोघरी तळी भरून खोबऱ्याचा प्रसाद वाटप केला जात होता. भगवान शंकर, श्रीराम, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे अशा विविध प्रकारच्या वेषभूषा करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यासह डोक्यात फेटा, टोपी घालून व गळ्यात फुलांचे हार घालण्यात आले होते.

यावेळी येथील वातावरणात चैतन्य निर्माण होऊन, अबाल वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव उमटल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने रामकुंडावर विविध खेळण्यांची छोटी मोठी दुकाने थाटली होती. पंचवटी विभागात असलेले नांदूर गाव, मानूर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, हिरावाडी यासह आदी भागात वीरांच्या मिरवणूक काढण्यात आल्या.

हेही वाचा :

Back to top button