पुणे : एकल महिलांच्या ’त्या’ बनल्या आधार! | पुढारी

पुणे : एकल महिलांच्या ’त्या’ बनल्या आधार!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाने घरातील कर्ता पुुरुष हिरावून नेला आणि कुटुंबावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला… घर कसे चालवायचे? मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करायचे? असे यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभे राहिले… मात्र, मुलींच्या मदतीने नैराश्येवर मात करीत त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या… स्वत:ला सावरत असतानाच आपल्यासारख्या 300 हून अधिक एकल महिलांना त्यांनी मदतीचा हात दिला. वनिता हजारे यांनी आपल्या अनुभवातून साकारलेले हे कार्य अनेकांसाठी आदर्श ठरले आहे.

वनिता हजारे यांच्या पतीचे कोरोनामुळे 3 ऑगस्ट 2020 रोजी निधन झाले. त्यांचे सुरुवातीचे सात-आठ महिने खूप नैराश्येत गेले. त्यातून बाहेर येण्यासाठी वर्षभर औषधोपचार सुरू होते. दोन्ही मुलींनी आईला दु:खातून सावरण्यास मदत केली आणि पुन्हा उभारण्याचे बळ दिले. त्या घरातून बाहेर पडल्या, एकल महिलांसाठी असलेल्या योजनांची त्यांनी माहिती करून घेतली. कागदपत्रे जमा करणे, फॉर्म भरणे, सरकारी कार्यालयांमध्ये जाणे, अशी कामे करीत असताना वनिता यांना एकट्या राहणार्‍या अनेक महिला भेटल्या.

काही जणी अशिक्षित असल्याने, कधीच घराबाहेर न पडल्याने त्यांना अनेक अडचणी येत होत्या. इंटरनेटचा वापर, बँकेची कामे, कागदपत्रे मिळविणे, अशा अनेक कामांसाठी वनिता यांनी महिलांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यांनी एकल महिलांचे संपर्क क्रमांक एकत्र करून ग्रुप तयार केला आणि आता त्याच एकमेकींचा आधार बनल्या. विफला फाउंडेशनच्या माध्यमातून 35 महिलांना प्रत्येकी दीड लाख रुपये, युथ फाउंडेशनकडून 30 महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये, जेएम फाउंडेशनकडून 60-70 महिलांना मदत मिळवून दिली आहे. एका महिलेचा पुनर्विवाह होण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला.

मला हेरंब कुलकर्णी सरांच्या एकल महिलांच्या कामाबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या माध्यमातून मयूर बागूल, रेणुका खिंवसरा, शीतल खोडवे आदींच्या मदतीने एकल महिलांसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. बचत गट सुरू करणे, महिलांना रोजगार मिळवून देणे, मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळवून देणे, प्रशिक्षण देणे अशा विविध माध्यमांतून काम सुरू आहे.

                                      – वनिता हजारे, सामाजिक कार्यकर्त्या

Back to top button