नाशिक जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका | पुढारी

नाशिक जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी पावसाने मंगळवारी (दि. ७) सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्याच्या विविध भागांत हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने काढणीला आलेला गहू, कांदा, द्राक्षपिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. तर या पावसाने चार जनावरे दगावली असून, पाच घरांचे नुकसान झाले. दरम्यान, बुधवारी (दि. ८) जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे.

हिमालयामधून येणाऱ्या पश्चिमी चक्रावातामुळे तसेच आग्नेय व दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहर व परिसरात सोमवारी (दि. ६) मध्यरात्री १ वाजता वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटास सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत कायम होतो. त्यानंतर दिवसभर पावसाने उसंत घेतली. मात्र, मध्यरात्री झालेल्या वादळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागांमध्ये विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.

ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा ग्रामीण जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच शेतीपिकांना फटका बसला आहे. काढणीला आलेला कांदा, गहू, द्राक्ष, बाजरी, भाजीपाल्यासह पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदरच भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाय अधिक खोलात गेला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाने जिल्ह्यात चार जनावरे दगावली आहेत. त्यामध्ये येवला व सिन्नरमध्ये प्रत्येकी एक गाय तसेच सुरगाण्यात दोन शेळ्या गतप्राण झाल्या. याशिवाय बागलाणला दोन तसेच इगतपुरी, निफाड व दिंडोरी प्रत्येकी एक असे एकूण पाच घरांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल यंत्रणा कृषी विभागाच्या मदतीने बांधावर जाऊन नुकसानीचे आकडे गोळा करत आहे.

हेही वाचा :

Back to top button